आरवली : जुन्या परंपरा कालबाह्य होत असतानाच संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावात मात्र आजही ‘सापड’सारखी जुनी परंपरा जाणीवपूर्वक जपली जात आहे. हरीक, वरी यांसारखी वरकस जमिनीतील पिके आज घेतली जात नसली तरीही ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर ही प्रथा आजतागायत निरंतर सुरु आहे. पूर्वीच्या काळात वरी, हरीक यांसारखी पिके मोठ्या प्रमाणावर केली जायची. डोंगर उतारावर ही पिके लावली जायची. पिके लावल्यानंतर काही दिवसांनी या पिकातून तण वाढते, ते काढणे या मूळ उद्देशाने ‘सापड’चा हा खेळ या पिकातून खेळला जायचा. शेतकरी जमून हातात खुरपे घेऊन गाण्यांच्या तालावर ही बेनणी करायचे. यामुळे पिकातील जमीन मळली जायची. याच्या परिणामाने पिकेही जोमाने वाढायची. यासाठी ‘सापड’ खेळली जायची, अशी माहिती येथील काही जाणकार मंडळीनी दिली. सध्या मात्र वरी, नाचणी, हरीक यांसारखी पिकेच कालबाह्य होत असल्याने ही प्रथाही बंद होत आली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ही प्रथा आजपर्यंत पुढे चालू ठेवली आहे. ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर ‘सापड’ झाल्यावरच गावातील आपल्या शेतात बेनणीला सुरुवात करण्याची पध्दत आहे. भातपिकाची लावणी संपल्यावर गावातील सर्व ग्रामस्थ एक दिवस एकत्र जमतात. सनई, ढोल, ताशे यांच्या गजरात ग्रामदेवता मंदिराच्या प्रांगणात या प्रथेला सुरुवात होते. प्रथम गावातील मानकरी आणि त्यांच्यासमवेत इतरही ग्रामस्थ वाद्यांच्या गजरात बेधुंद होत पायाच्या ढोपरांवर बसून बेनणीला सुरुवात करतात. वाद्यांच्या तालावर कधी प्रांगणाची साफसफाई केली जाते हे लक्षातही येत नाही. यावेळी पाऊस असेल तर खूपच रंगत वाढते, असे ग्रामस्थांनी सांगितले. पाऊस नसेल तर कृत्रिमरित्या पाणी मारुन ही रंगत वाढविली जाते. बेनणी झाल्यानंतर अल्पोपाहार घेतला जातो आणि कार्यक्रमाची सांगता केली जाते. या दिवसापासून गावातून पिकांची बेनणी सुरु होते. बेनणी आणि पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अमलात आलेली ही जुनी प्रथा. यामागे ग्रामस्थांची श्रद्धा हा भागही महत्त्वाचा आहे. मात्र, ज्या पिकासाठी ही प्रथा सुरु झाली ती पिके जरी कालबाह्य होत असली तरी चिखलीसारख्या गावातून ही प्रथा मात्र सुरु असल्याचे पाहायला मिळते. (वार्ताहर)संगमेश्वर तालुक्यात चिखली गावात सापडसारखी परंपरा सुरू आहे. ग्रामदेवतेसमोर सापडची प्रथा आजही कायम राखल्याबद्दल अनेक ठिकाणी उत्सुकता आहे. पायाच्या ढोपरावर बसून बेनणी करणे अशी प्रथा आहे.
चिखली गावात जपली जातेय ‘सापड’ प्रथा...
By admin | Updated: August 17, 2014 22:32 IST