शोभना कांबळे - रत्नागिरी -विधानसभा निवडणुकीसाठी यंदा शांततेत मतदान झाले. यामागे जवळपास ११ हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे कष्ट कारणीभूत आहेत. मतदानाच्या स्लिपा वाटण्याच्या कामापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि पुन्हा मतमोजणीच्या तयारीपर्यंतच्या कामात कर्मचाऱ्यांनी अखंड ५० तासांहून अधिक काळ केलेल्या कामामुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत झाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या काही किरकोळ चुकांची दुरुस्ती करून उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे उदाहरण देत या यंत्रणेने शिस्तबद्ध पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा पार केला. तरीही मोकळा श्वास न घेता मतमोजणीचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करण्याचे ध्येय यंत्रणेने बाळगले आहे. त्यामुळेच अविश्रांत सेवा अजूनही सर्वत्र सुरूच आहे. खरंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणूक जाहीर झाली. ती संपल्यानंतर जेमतेम चार महिन्यांनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीचे आव्हान समोर ठाकले. मात्र, आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या आधारावर त्यांनी आपल्या सर्व सहकारी उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि सर्व कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्याने कुशलतेने कौशल्यपूर्ण नियोजनाने ही निवडणूकही यशस्वी करून दाखवली आहे. जिल्ह्याच्या दूरवरच्या भागासाठी नियुक्त कर्मचारी तर १३ आॅक्टोबरच्या रात्रीपासून निवडणूक कामात व्यस्त झाले आहेत. अशा ११ हजारापेक्षा कर्मचाऱ्यांनी तीन दिवस सलग दिवस-रात्र म्हणजेच ६0 तासांहून अधिक काळ सेवा बजावली आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदानाचे आकडे संकलित केले. त्यानंतर त्याची छाननी करून कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यासाठी गुरुवारची पहाट उजाडली. त्यानंतरही सर्व मतदान यंत्र नियोजित सुरक्षित स्थळी आणल्यानंतरच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय पहाटे पाच वाजेपर्यंत सुरूच होते. मात्र, दुसऱ्या दिवशाही कुठलीच मरगळ अधिकारी वा कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. झापड येत असतानाही राबणारे कर्मचारी, सतत आढावा घेणारे अधिकारी, संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत सुरू असलेला संपर्क, कार्यालयात खणाणत असलेले फोन, मतदान झाले म्हणून सुस्कारा टाकण्याऐवजी लगेच तासाभराची विश्रांती घेऊन सुरू झालेली मतमोजणीची तयारी, असे चित्र आज सर्वत्र दिसून आले. अविश्रांत सेवेच्या तासांचे अर्धशतक पूर्ण करूनही आज निवडणूक यंत्रणा पुन्हा उत्साहाने राबताना दिसून आली. आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. महिनाभर सुरू असलेला निवडणुकीचा ताण कुठल्याच अधिकारी वा कर्मचाऱ्यावर दिसत नाही.रात्री दहा वाजताही स्लिपा पोहोचमतदानाच्या स्लिपा वाटण्याचे कामही ज्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले होते, त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी हे काम इमानेइतबारे पूर्ण केले. काही ठिकाणी स्लिपा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी असल्या, तरीही लोकांनी झालेल्या चांगल्या कामाचेही कौतुक केले. ज्यांना स्लिपा मिळाल्या नाहीत, अशा मतदारांनीही कॉल करून तक्रारी केल्या. परंतु यंदा त्याचे प्रमाण खूप कमी होते. मतदारांनी घेतला कॉलसेंटरचा लाभ...जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिल्याने एका कॉलवर मतदारांना त्यांचे नाव, यादी, भाग क्रमांक आणि अन्य तपशील उपलब्ध केला जात होता. या क्रमांकाचा लाभ या निवडणूक कालावधीत अनेक मतदारांनी घेतला. या सर्व मतदारांना त्यांचे समाधान होईपर्यंत माहिती देण्याचे काम निवडणूक कार्यालयाने केले. मतदारांना ही सेवा देण्यासाठी निवडणूक कार्यालयात सकाळी ९ ते रात्री १0 वाजेपर्यंत कर्मचारी राबत होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी हे राष्ट्रीय काम आहे, याची जाणीव ठेवून सर्व कर्मचारी आपले काम तळमळीने करताना दिसून येत होता. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया यशस्वी होण्यामागे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी यांचे अविश्रांत परिश्रम आहेत. त्यामुळे कमी कालावधीतही योग्य नियोजन करणे शक्य झाले आणि तशी अंमलबजावणीही झाली. विशेष म्हणजे सर्व नागरिकांचे सहकार्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. - राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, रत्नागिरीजिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले प्रोत्साहन, त्यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास यामुळे त्या विश्वासास पात्र राहात कर्मचाऱ्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. त्यामुळेच किचकट वाटणारे कामही लिलया पार पाडले गेले. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. अजूनही कर्मचारी अविश्रांत राबत आहेत. मतमोजणीपर्यंत हाच उत्साह कायम राहील, याची खात्री आहे.- नंदकुमार जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरीदहा लाखांवर संदेशमतदार जागृती अभियानाचा एक भाग म्हणून मोबाईलवर सर्वांना मेसेज पाठविण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबविला. या कालावधीत बीएसएनएलतर्फे तब्बल २ लाख ५० हजार मेसेज पाठविण्यात आले. त्याबरोबर इतर खासगी कंपन्यांचे मिळून दहा हजारच्या आसपास मोबाईलवरून अगदी मतदानाला शेवटचा अर्धा तास असतानाही मतदारांना संदेश पाठविण्यात आले. त्रुटींची दुरुस्तीलोकसभा निवडणुकीत मतदारयाद्यांबाबत निर्माण झालेल्या त्रुटी दूर करून प्रशासनाने त्यात अनेक बदल केले. मतदारांना वारंवार नावाची खातरजमा करण्याबाबतची सूचना देण्यात आली होती.
पन्नास तासांचे अथक परिश्रम
By admin | Updated: October 17, 2014 22:54 IST