कुडाळ : झाराप येथील शाळेत शिक्षक देण्यासंदर्भात कुडाळ गटशिक्षणाधिकारी यांनी चालढकलपणा केला असून ग्रामस्थ व पालकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे शाळेला शिक्षक देण्यासाठी झाराप ग्रामस्थ, पालक कुडाळ पंचायत समितीसमोर १५ आॅगस्ट रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाराप येथील राजू तेंडोलकर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. झाराप येथील केंद्रशाळा क्र. १ या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत सर्व शिक्षिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेला एक शिक्षक देण्यात यावा, याकरिता गतवर्षी १५ आॅगस्ट रोजी उपोषण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर २०१४ रोजी शाळेला शिक्षक देण्याचे आश्वासन देऊन उपोषण टाळण्याची विनंती कुडाळ पंचायत समितीच्यावतीने देण्यात आले होते. परंतु शिक्षक समायोजनातही शिक्षक न दिल्याने ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, शिक्षक समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता त्यात कुठलाही बदल होणार नाही, त्यामुळे समायोजनात नियुक्त केलेलीच शिक्षिका शाळेत कार्यरत राहील, अशी माहिती पंचायत समितीतून देण्यात आली. त्यामुळे १५ आॅगस्टपासून उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे राजू तेंडोलकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकासाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST