गजानन बोंद्रे / साटेली भेडशी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली शेती ही पारंपरिक शेतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक फायदेशीर आहे. आधुनिक शेतीतून मिळणारे उत्पन्न पारंपरिक शेतीपेक्षा निश्चितच जास्त आहे. आधुनिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची बाजारपेठ ठरलेली असते. तर बऱ्याचवेळा या शेतीतून मागणीप्रमाणे उत्पन्न काढून विकल्याने मालाची नासाडी न होता योग्य वेळेत तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे त्यातून मिळणारा फायदा निश्चित आणि चांगला असतो. भांडवलाची कमतरता, आधुनिक शेतीची माहिती नसणे यामुळे लहान मोठे अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे न वळता ते पारंपरिक शेतीतच समाधान मानतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना फायदा त्यामानाने कमी मिळतो. त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. माल योग्य वेळेत बाजारपेठेत न पोहोचल्याने शेतीमाल खराब होतो. मालाची नासाडी होणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पारंपरिक शेती करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना बऱ्याचवेळा नुकसानीस सामोरे जावे लागते. आधुनिक शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. नांगरणीची विविध साधने, पाणी पुरवठ्याची साधने आदीसाठी गुंतवणूक करावी लागल्याने भांडवलाची आवश्यकता मोठी असते. परंतु आधुनिक शेतीसाठी ज्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक त्या प्रमाणात आणि निश्चित मोठ्या प्रमाणावर फायदा आधुनिक शेतीतून आपण मिळवू शकतो. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती निश्चितच फायदेशीर आहे. पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे या शेतीतून वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. परंतु आधुनिक शेतीतून कमी जागेत, योग्य वेळेत मर्यादित खर्चात अधिकाधिक उत्पन्न घेता येते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा आधुनिक शेतीतून पूर्ण होऊ शकतात. पारंपरिक शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने पावसाची अनिश्चितता, दिवसेंदिवस उष्णतेत होणारी वाढ तसेच अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. काही वेळा उत्पन्न जास्त, तर काही वेळा बरीच घट होते. उत्पन्नात घट झाली, तर त्या शेतीवर केलेला खर्चही निघताना कठीण होते. परिणामी शेतकरी तोट्यात जातो. आधुनिक शेतीत यंत्राचा वापर, योग्य व नियमित पाणी पुरवठा, योग्य सेंद्रीय आणि रासायनिक खतांचा वापर यामुळे या शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निश्चित मिळते. उत्पन्नाची निश्चिती आणि उत्पन्नातील प्रमाणाचीही निश्चिती असल्याने तसेच या मालाची प्रत चांगली असल्याने अशा मालाला योग्य वेळी योग्य बाजारपेठ मिळते. त्यामुळे याचा शेतकऱ्याला अधिकाधिक फायदा मिळून ग्राहकांनाही चांगला माल बाजारपेठेत मिळतो. पीक हातात येईपर्यंतचा कालावधी, खतांचे प्रमाण, मिळणारे उत्पन्न, पाण्याचे प्रमाण हे सर्व काही आधुनिक शेतीत निश्चित असते. कारण या सर्वांचा अभ्यास शेतकरी पीक घेण्याआधीपासूनच करत असतो. त्यामुळे खर्च आणि फायदा या शेतकऱ्याला साधारणपणे माहीत असतो. शेतीत यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने मजुरांची संख्या घटून फायदा वाढतो. आधुनिक शेतीला करण्यात येणारा पाणीपुरवठा योग्य प्रमाणातच असतो. त्यासाठी योग्य सिंचन पध्दतीचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टळतो. पिकाला मिळणारे पाण्याचे प्रमाण योग्य असल्याने उत्पन्नात वाढ होते. शेतीला पुरविण्यात येणारी सेंद्रीय आणि रासायनिक खतांचेही प्रमाण योग्य असल्याने खर्च मर्यादित होऊन फायद्याचे प्रमाण वाढते. आधुनिक शेतीतील शेतकरी बऱ्याचवेळा मोठे हॉटेल व्यावसायिक आणि शेतीमाल विक्रेते यांच्याबरोबर करार करूनच त्याप्रमाणात उत्पन्न घेतात. त्यामुळे शेतीतील माल तयार झाल्यानंतर लगेचच बाजारपेठेत आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये पोहोचतो. त्यामुळे यातून शेतकरी चिंतामुक्त होतो. मालाची नासाडी न होता मालाला योग्य भाव मिळतो. आधुनिक शेती ही संकल्पना अधिकाधिक दृढ करण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्यातून विविध प्रशिक्षण शिबिरे, कमी व्याजदरात मुबलक कर्जपुरवठा, सवलतीच्या दरात विविध शेतकी उपकरणे अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जातात. याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घेऊन आपल्या शेतातील उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल
By admin | Updated: June 24, 2014 01:43 IST