रत्नागिरी : भारत स्वच्छता अभियान राबविण्यात येत असतानाच मांडवी किनारपट्टीवर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेली प्लास्टिकची बॅरल तुडुंब भरली आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथे फिरायला येणाऱ्या लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली होती़ जिल्हाधिकारीऱ्यांनी भाट्ये, आरे-वारे, मांडवी किनाऱ्यावर दारु पिण्यासाठी बसलेल्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला होता़ या उपक्रमामध्ये शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या व लोकांना सहभाग करुन किनारे स्वच्छता मोहीम राबविली होती़ त्याचवेळी भाट्ये किनारा फिनोलेक्स कंपनी आणि मांडवी किनारा अल्ट्राटेक कंपनीने स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली होती़ या स्वच्छतेच्या वेळी मांडवी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनी कचरा करु नये, यासाठी नऊ ठिकाणी प्लास्टिकची बॅरल ठेवण्यात आली होती़ मांडवी किनारा गतवर्षी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या वेळी चकाचक करण्यात आला होता़ मात्र, त्यानंतर याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. या किनाऱ्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत नसल्याने तेथे दारुच्या बाटल्या, प्लास्टिक किनाऱ्यावर कित्येक दिवस पडलेले असते़ कचरा टाकण्यासाठी लावण्यात येणारी प्लास्टिक बॅरल गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱ्याने तुडुंब भरलेली आहेत़ या बॅरलमधून कचरा वेळीच साफ केला जात नसल्याने दुर्गंधी पसरते. एक बॅरल तर वाहून गेले असून, ते किनाऱ्यावर आडवे झाले आहे़ येथील मारुती मंदिरशेजारीच अल्ट्राटेक कंपनीच्या फलकाला लागून असलेले बॅरल कचऱ्याने भरले असून, किनाऱ्यावर कचरा पसरला आहे. हा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने अस्ताव्यस्त पसरलेला आहे. एकूणच किनारपट्टीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे़ एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना दुसरीकडे कचऱ्याने भरलेली बॅरल साफ करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)मांडवी किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्या, दारुच्या बाटल्या फेकल्या जातात़ हा कचरा वेळीच साफ करण्यासाठी संबंधितांना वेळ मिळत नाही़ त्यामुळे अमावास्या, पौर्णिमेच्या दिवशी उधाणाच्या भरती-ओहोटीची वाट पाहावी लागते. याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे़
संपली मोहीम, संपली जागृती... मांडवीला अस्वच्छतेचा फेरा
By admin | Updated: November 9, 2014 23:37 IST