सुभाष कदम - चिपळूण =चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. वाडीवस्तीवर प्रचार बैठका सुरु आहेत. दोन्ही पक्षांचे उमेदवार तूल्यबळ असून, उच्चविद्याविभूषित आहेत. दोघांचेही चारित्र्य निष्कलंक असल्याने ही लढत अधिक रंगतदार होणार आहे. चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघात शिवसेना महायुतीतर्फे पुन्हा एकदा सदानंद चव्हाण यांनाच उमेदवारी मिळेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे शेखर निकम यांचे नाव जाहीर झाल्यात जमा आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी आदी पक्षांचे उमेदवारही रिंगणात असतील. २००९मध्ये झालेल्या निवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात होते. परंतु, मुख्य लढत शिवसेनेचे सदानंद चव्हाण विरुद्ध रमेश कदम यांच्यात झाली होती. या विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी १८ हजार मतांनी बाजी मारली होती.आघाडीतील रिपब्लिकन पक्ष आता महायुतीत आहे, तर काँग्रेसचे माजी आमदार सुभाष बने हे आता शिवसेनेत परतले आहेत. त्यामुळे सेनेची ताकद वाढली आहे. माजी पालकमंत्री रवींद्र माने त्यावेळी शिवसेनेत होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत.आमदार सदानंद चव्हाण यांनी केलेली विकासकामे, मतदार संघाशी ठेवला सततचा संपर्क व चिपळूणपेक्षा संगमेश्वर तालुक्याला दिलेले झुकते माप याचा विचार करता चव्हाण हे सक्षम उमेदवार आहेत. शिवसेनेत आदेश पाळला जातो. त्यामुळे काहींची नाराजी असली तरी त्याचा फरक मतांवर होत नाही. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेला अवघड नाही. शिवसेना मजबूत स्थितीत असली तरी शिवसेनेच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी राष्ट्रवादीने सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात आणला आहे. मुळात चव्हाण व निकम हे नातेवाईक आहेत. माजी खासदार गोविंदराव निकम यांची पुण्याई निकम यांच्या मागे आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सर्व आलबेल आहे, असे वरकरणी दिसत असले तरी पक्षातील काही मंडळी निकम यांना विजयापासून रोखण्यासाठी अंतर्गत प्रयत्न करणार हे निश्चित. त्यामुळे वैयक्तिक निकम यांनी प्रचंड मेहनत घेऊन निवडून येण्यासाठी कितीही गोळाबेरीज केली तरी अंतर्गत बंडाळीमुळे त्यांचे प्रयत्न कितीसे फळाला येतात, याबाबत प्रश्न आहे. निकम यांच्यासारखा शांत, संयमी व सर्वांना समजून घेणारा व उच्च विद्याविभूषित उमेदवार असल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. पण, आमदार चव्हाण हे सुद्धा उच्च विद्याविभूषित, शांत व संयमी नेतृत्त्व आहे. शिवाय मतदार संघात त्यांनी कोणाचाही रोष ओढवून घेतलेला नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार या सर्व वैशिष्ट्यांमध्ये तूल्यबळ आहेत.आता या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदान कोणाच्या बाजूने कौल देतो, हे १९ आॅक्टोबरला कळणार आहे.
चिपळुणात तूल्यबळ लढतीची अपेक्षा
By admin | Updated: September 17, 2014 22:23 IST