रत्नागिरी : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व ६५ महसूल मंडलांना भात व नागली पिकासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता विमा उतरवण्याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लागू आहे. ६० टक्के जोखीम स्तरानुसार भात पिकाकरिता १५ हजार रुपये विमा रकमेसाठी २.५० टक्के हप्त्याप्रमाणे ३७५ रुपये प्रतिहेक्टर भरावेत. तसेच ८० टक्के जोखीम स्तरानुसार नाचणी पिकाकरिता १२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रकमेसाठी २.५० टक्के हप्त्याप्रमाणे हेक्टरी ३१२.५ रुपये रक्कम भरावयाची आहे. भातशेतीच्या ज्या शेतकऱ्यांना जादा रक्कम विमा संरक्षित करावयाची आहे, त्यांना उंबरठा उत्पन्नात १५० टक्केपर्यंत अतिरिक्त संरक्षण देता येते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त १२ टक्के हप्ता म्हणजेच एकूण ३७ हजार ४०० रुपये प्रतिहेक्टरी रक्कम संरक्षित होण्यासाठी ३ हजार ६३ रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे. नागली पिकासाठी अतिरिक्त संरक्षण २३ हजार ५०० रुपयांपर्यंत लागू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त ८ टक्केम्हणजे २३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी संरक्षण रकमेसाठी ११९२.५ विमा हप्ता द्यावा लागणार आहे. भात व नागली पीक विमा हप्त्यात अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी १० टक्के सूट मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणारी विमा योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. योजना १६ आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय पीक विमा योजनेला मुदतवाढ
By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST