सिंधुदुर्गनगरी : लक्झरी बसमध्ये टीव्ही बघण्याच्या कारणावरून गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या सहप्रवाशावर पिस्तुलाने गोळी झाडून त्याला जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी सैनिक चंदीप्रसाद बडतवाल (वय ४५, रा. पद्मपूर सुखरे जि. पवरी-गडवाल, राज्य उत्तराखंड) यांना जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी सात वर्षे सश्रम कारावास व ५५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ३० जानेवारी २०१२ रोजी नरेश सुरेश भुसाळे (वय २५, रा. अंधेरी) हे आपल्या मित्रांसमवेत गोवा फिरून लक्झरी बसने मुंबईला निघाले होते. त्या बसमध्ये चंदीप्रसाद बडतवाल हेही होते. प्रवासादरम्यान बसमध्ये टीव्ही चालू होता. मात्र बडतवाल यांच्या मागच्या सीटवर बसलेले भुसाळे यांना टीव्ही नीट दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी बडतवाल यांना आपणास टीव्ही दिसत नसल्याचे सांगून आपण नीट बसा असे सांगितले. यामुळे संतापलेल्या चंदीप्रसाद बडतवाल यांनी भुसाळे यांना टीव्ही दिसू नये, या उद्देशाने जागेवर उभे राहिले. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. बडतवाल यांनी आपल्या कमरेला असलेले पिस्तूल भुसाळे यांच्यावर रोखले व गोळी झाडली. ही गोळी भुसाळे यांच्या उजव्या पायाच्या मांडीतून आरपार बाहेर पडली. बसमध्ये गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने चालकाने गाडी तत्काळ थांबविली. हा सर्व प्रकार सायंकाळी खारेपाटण येथील चेकपोस्ट येथे घडला. त्यामुळे तेथील हेडकॉन्स्टेबल शंकर चिंदरकर यांनी बसमध्ये चढून बडतवाल यांच्याकडील पिस्तूल काढून घेत त्यांना ताब्यात घेतले.
माजी सैनिकाला सात वर्षे कारावास
By admin | Updated: July 15, 2015 00:45 IST