मालवण : तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या स्कुबा डायव्हींग सेंटरच्या नामफलकावरील ‘तारकर्ली’ नाव अनधिकृतरित्या हटविणाऱ्या देवबाग येथील ग्रामस्थांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी रविवारी तारकर्ली ग्रामस्थांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. एमटीडीसीचे स्कुबा डायव्हींग सेंटर तारकर्ली हद्दीत असल्याने यापुढे सेंटरच्या नामफलकावर तारकर्ली गावाचाच उल्लेख असावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. तसेच तारकर्ली नाव हटविणाऱ्या संबंधित ग्रामस्थांवर दोन दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाला बसावे लागेल, असा पवित्रा तारकर्ली ग्रामस्थांनी आज घेतला.आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हींग सेंटर तारकर्ली गावाच्या हद्दीत असल्याने डायव्हींग सेंटरच्या फलकावर तारकर्ली गावाचेच नाव असावे, अशी मागणी तारकर्ली ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. स्कुबा डायव्हींग सेंटरची इमारत तारकर्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. या सेंटरच्या बांधकामाला तारकर्ली ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे. मात्र या सेंटरच्या नामफलकावर देवबाग- तारकर्ली या गावांचा संयुक्त उल्लेख करण्यात आला होता. यासंदर्भात तारकर्ली ग्रामपंचायत आणि एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांची बोलणी सुरू होती. याची माहिती समजताच शनिवारी देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी स्कुबा डायव्हींग सेंटर गाठत पर्यटन महामंडळाने जर तारकर्लीबरोबरच देवबाग गावाचे नाव लावण्याचे ठरविले असेल तर त्याला हटविण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली. देवबाग ग्रामस्थांनी यावेळी तारकर्ली नावाचा उल्लेख असलेली नावाची पट्टी काढून टाकली. ही माहिती समजताच आज तारकर्ली ग्रामस्थांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला.तारकर्ली ग्रामस्थ आक्रमकस्कुबा डायव्हींग सेंटरच्या फलकावरील तारकर्ली नाव हटविणाऱ्या देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह अन्य ग्रामस्थांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तारकर्ली ग्रामस्थांनी एमटीडीसीचे विभागीय अधिकारी शेख यांच्याजवळ केली. यावेळी तारकर्ली ग्रामस्थ आक्रमक झाले होते. स्कुबा डायव्हींग सेंटरवर देवबाग व तारकर्ली गावांचा संयुक्त उल्लेख करणे चुकीचे होते. तारकर्ली हद्दीत असलेल्या सेंटरवरील देवबाग गावाचा उल्लेख करण्याचा एमटीडीसीने घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळेच दोन गावात वाद झाल्याचे तारकर्ली सरपंच मोहन केळुस्कर म्हणाले. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून शेवटी एमटीडीसीचे अधिकारी शेख यांनी सेंटरवरील तारकर्ली नाव अनधिकृतरित्या हटविणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यात यावी, असे पत्र पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांना तत्काळ दिले. तसेच स्कुबा डायव्हींग सेंटरवरील गावांच्या नामफलकाबाबत वरिष्ठांशी चर्चा करून व ग्रामस्थांच्या मतांचा आदर राखत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे शेख म्हणाले.यावेळी तारकर्ली सरपंच मोहन केळुस्कर, पंचायत समिती उपसभापती देवानंद चिंदरकर, उपसरपंच गजा कुबल, सदस्य महेश मयेकर, जयवंत लुडबे, मिताली चव्हाण, सरोजिनी बटा, ज्योती कुबल, स्रेहा मोरजकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, डॉ. चंद्रशेखर परब, भाई कुबल, स्वप्नील मयेकर, मिथिलेश मिठबावकर, शिवशंकर माडये, यशोधन पडवळ, बाळू मुंडये, नीलेश पणदूरकर, सहदेव बापार्डेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हींग सेंटरवरील तारकर्ली नाव अनधिकृतरित्या हटविणाऱ्या देवबाग ग्रामस्थांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी तारकर्ली ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
तारकर्ली ग्रामस्थांचा एमटीडीसी अधिकाऱ्यांना घेराओ
By admin | Updated: November 16, 2014 23:55 IST