तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली परिसरात हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. शेती-बागायतीच्या नासधुसीमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. सोनुर्ली गावात गेले दोन दिवस हत्तींनी शेती उद्ध्वस्त केली आहे. यामध्ये शेतीबागायती तसेच माड, केळी बागायतीचे सुमारे एक लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. सोनुर्ली गावातील गावकर कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात शेती, बागायती आहे. यातील भिकाजी शंकर गावकर यांचे ३५ माड आणि केळी, यशवंत गावकर यांचे १० माड, केळी आणि अन्य शेतीचे हत्तींनी नुकसान केले. तर बाबलो गावकर यांची पूर्ण माड बागायतीच जमीनदोस्त केली आहे. सध्या शेतकरी वर्ग भातशेतीच्या लागवडीत व्यस्त आहे. त्याबरोबरच माड, केळी बागायतीची खत-पाणी देऊन निगा राखली जात आहे. परंतु हत्तींकडून शेतीबागायतीचे नुकसान होत असून हाताशी आलेले उत्पन्नही हिरावले जात असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)
सोनुर्ली परिसरात हत्तींचा वावर सुरुच
By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST