मेहरुन नाकाडे -रत्नागिरी -तासन्तास रांगेत उभे राहून वीजबिल भरण्यापेक्षा तातडीने भरता यावे, यासाठी स्वयंचलित वीजबिल केंद्र सुरू करण्यात आली. २४ तास वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरणने कोकण झोनमध्ये पाच एटीपी केंद्र सुरू केली आहेत. या पाचही केंद्रात अवघ्या एका महिन्यात २४ हजार ७८३ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे महावितरणला २ कोटी ८७ लाख ७३ हजार २४९ रूपयांचा महसूल मिळाला आहे.आॅक्टोबर महिन्यात रत्नागिरी विभागातील १६ हजार ५६० ग्राहकांनी २ कोटी २९ लाख ४५ हजार ७७७ रूपये एटीपी केंद्रात भरले आहेत. सप्टेंबर महिन्यात १६ हजार २०५ ग्राहकांनी याचा लाभ घेतला होता. त्यामुळे १ कोटी ९२ लाख ८३ हजार ४१५ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार २२३ ग्राहकांनी एटीपी केंद्रात ५८ लाख २७ हजार ४७२ रूपये भरले होते. सप्टेंबरमध्ये ८ हजार ९३६ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ६९ लाख ७३ हजार ३२६ रूपये भरण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यातील रत्नागिरी विभागाचे उत्पन्न कमी होते, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पन्न वाढल्याचे दिसून येत आहे.रत्नागिरी शहरात नाचणे येथे सुरू असलेल्या एटीपी केंद्राला देवरूख, रत्नागिरी ग्रामीण १ व २, राजापूर १ व २, रत्नागिरी शहर, राजापूर, लांजा, संगमेश्वर विभाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे शहरात अन्य कामकाजासाठी आलेल्या ग्राहकाना एटीपी केंद्राव्दारे बिल भरणे सोपे होते. रत्नागिरी केंद्रामध्ये ११ हजार ४२७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे १ कोटी ८१ लाख ६ हजार ८७७ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. चिपळूण केंद्रामध्ये चिपळूण शहर व ग्रामीण, सावर्डे, गुहागर हा विभाग जोडण्यात आला आहे. चिपळूण विभागातील ४२०७ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ३८ लाख २८ हजार ८९० रूपये प्राप्त झाले आहेत. खेड केंद्राला खेड, लोटे, दापोली १ व २ जोडले आहेत. ९२६ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्यामुळे १० लाख १० हजार १० रूपये प्राप्त झाले आहेत.कणकवली विभागातून ५ हजार २३५ ग्राहकांनी ३६ लाख ७० हजार ६४२ रूपये, मालवण विभागातून २ हजार ९८८ ग्राहकांनी २१ लाख ५६ हजार ८३० रूपयांचा महसूल भरला आहे. एटीपी केंद्रामुळे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. तासनतास रांगेत तिष्ठत उभे राहण्यापेक्षा लवकर व सुटीच्या दिवशीही बिल भरणे शक्य होत आहे.ग्राहकांचा वेळ वाचतो. तसेच सुटीच्या दिवशी वीजबिल भरणे सुकर होत असल्यामुळे एटीपी केंद्राकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ग्राहकांच्या हितार्थ रत्नागिरी शहरातील रहाटाघर येथे आणखी एक एटीपी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना वीजबिल भरणे सोपे होईल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व सावंतवाडी येथेही स्वतंत्र दोन स्वयंचलित वीजबिल केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.- एस. टी. नागटिळक, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.
एका महिन्यात भरली गेली तब्बल पावणेतीन कोटींची वीजबिले
By admin | Updated: November 14, 2014 23:17 IST