खारेपाटण : तालुक्यातील सहकार क्षेत्रात २६ वर्षे प्रगतिपथावर कार्यरत असलेली प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. आतापर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, पैकी ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर १४ उमेदवार ७ जागांसाठी नशीब अजमावताना दिसत आहेत.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर होताच खारेपाटण पंचक्रोशीतील सभासदांनी व संचालकांनी बिनविरोधसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी दोनच अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे. १४ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी करताना प्रकाश बबन कांबळी, वीरेंद्र बाळकृष्ण चिके, इस्माईल कादीर मुकादम व विश्वनाथ विष्णू खानविलकर यांचे अर्ज बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मयेकर यांनी जाहीर केले, तर संस्थेचे अध्यक्ष प्रवीण दिगंबर लोकरे हे विशेष मागास प्रवर्गातून, तर उपाध्यक्ष नासीर काझी सर्वसाधारण गट वैभववाडी येथून बिनविरोध निवडून आले. संस्थेचे विद्यमान संचालक संतोष यशवंत पाटणकर अनुसूचित जाती प्रवर्गातून, विजय धोंडू कुडतरकर (सर्वसाधारण गट देवगड) व संतोष विष्णू हर्याण (सर्वसाधारण गट वैभववाडी) येथून बिनविरोध निवडून आले आहेत.एकूण १२ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत ५ जागा या विद्यमान संचालक मंडळाच्या भालचंद्र महाराज विकास पॅनेलतर्फे निवडून आलेल्या असून, २९ डिसेंबरला मागे घेण्याच्या दिवशी विद्यमान विजय नेमिनाथ कळंत्रे व राजेश पांडुरंग वारंगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ७ जागांसाठी १४ जण उभे आहेत. भालचंद्र महाराज विकास पॅनेल (विद्यमान संचालक) यांच्यावतीने सर्वसाधारण गट कणकवली यामधून शरद कर्ले, सुधाकर कर्ले, शेखर राणे, राजेंद्र ब्रह्मदंडे, महिला राखीव प्रवर्गातून श्रद्धा देसाई व वर्षा ब्रह्मदंडे, तर इतर मागासमधून संजय शेट्ये हे उमेदवार उभे आहेत. विद्यमान पॅनेलच्या विरोधात कणकवली सर्वसाधारण गटमधून रफिक नाईक, लियाकत काझी, परवेज पटेल, महेंद्र मण्यार, महिला राखीव प्रवर्गातून उज्ज्वला चिके, तर इतर मागास प्रवर्गातून मंगेश गुरव, प्रकाश मोहिरे हे निवडणूक रिंगणात उभे असून, येत्या ८ जानेवारीला मतदान होत आहे.प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था २६ वर्षे चांगली सेवा जनतेला देत असून संस्थेचे कणकवली, देवगड व वैभववाडी असे कार्यक्षेत्र असून वैभववाडीकरिता २ जागा, देवगडकरिता १ जागा, तर कणकवली तालुक्यासाठी ४ जागा, महिलांसाठी राखीव २ जागा, इतर मागास प्रवर्ग १ जागा व अनुसूचित जातीकरिता १ जागा, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जाती याकरिता १ जागा अशा १२ संचालकांचे वर्गवारीत विभाजन केले आहे. (वार्ताहर)विद्यमान पॅनेलचे पारडे जडविद्यमान संचालक पॅनेलचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे जवळजवळ त्यांचे पारडे जड असून विरोधी उमेदवारांना मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून, घरोघरी व भेटीगाठीवर भर सुरू आहे. भालचंद्र महाराज विकास पॅनेलचे सर्व उमेदवार काँग्रेसचे असून, विरोधी उमेदवारसुद्धा काँग्रेसचेच सर्व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खारेपाटण पतसंस्थेची निवडणूक जवळजवळ अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी म्हणायला हरकत नाही. निवडणूक रिंग्ांणात उभे असलेले बरेच उमेदवार काँग्रेसचे जिल्ह्यातील महत्त्वाची पदे भूषविलेले कार्यकर्ते आहेत. खारेपाटण पतसंस्थेची ही निवडणूक सर्वांच्या दृष्टीने लक्षणीय ठरली आहे हे निश्चित.
खारेपाटण पतसंस्थेची ८ जानेवारीला निवडणूक
By admin | Updated: January 1, 2016 00:01 IST