कसई दोडामार्ग : तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या वनटाईम सेटलमेंटबाबत तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्यात आले. शुुक्रवारी दोन्ही कालव्यांचे पाणी बंद करण्यात येणार असून तिलारी कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा संघर्ष समितीचे सचिव संजय नाईक यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच आम्हाला अटक केली तरीही जेलमध्ये आंदोलन सुरु ठेवणार असेही नाईक यांनी सांगितले आहे.तिलारी प्रकल्पग्रस्तांना वनटाईम सेटलमेंटची रक्कम अद्यापही न मिळाल्याने बुधवारपासून ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मात्र, गुरुवारी दिवसभरात कोणीही आंदोलनस्थळी भेट दिली नाही. दरम्यान, संजय नाईक यांनी तिलारी प्रकल्प अधीक्षक खलिप अन्सारी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न येता, दमदाटीची भाषा वापरण्यात आल्याचे संजय नाईक यांनी सांगितले. अन्सारी यांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्याने आंदोलनकर्त्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला. निवडणुकीपूर्वी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासने दिली होती. मात्र, ती अद्यापही पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोबदला न मिळण्याकरिता जबाबदार या मंत्र्यांवर व लोकप्रतिनिधींवर कारवाईची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)आंदोलन चिघळणारआंदोलनकर्त्यांच्या चर्चेनंतर शुक्रवारी दोन्ही कालव्यांचे पाणी बंद करण्यात येणार असून तिलारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अटक करण्यात आल्यास जेलमध्येही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
तिलारी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; आंदोलन सुरुच
By admin | Updated: April 17, 2015 00:22 IST