रत्नागिरी : विशेष कारागृहातून दोन आरोपी पसार झाल्याने सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्याची दखल घेत पुणे कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी आज, शुक्रवारी सकाळी सुमारे तीन तास कारागृहातील आठ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. हे कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याबाबतचा रत्नागिरीचे विशेष कारागृह अधीक्षक संजय जाधव येत्या सोमवारी आपला अहवाल राज्याच्या तुरुंग महानिरीक्षकांना पाठविणार आहेत. त्यानंतर दोषींवर कारवाईबाबत निर्णय अपेक्षित आहे.या एकूणच प्रकरणाबाबत पत्रकारांना माहिती देताना अधीक्षक संजय जाधव म्हणाले की, पुण्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी आज सकाळी कारागृहाला भेट दिली. त्यावेळी कच्चे कैदी पसार झाल्याच्या प्रकरणाची त्यांनी कसून चौकशी केली आहे. याबाबतचा आपला अहवाल त्या स्वतंत्रपणे सादर करणार आहेत. आपण आपला अहवाल राज्य कारागृह महानिरीक्षकांना येत्या सोमवारी पाठविणार आहोत. कारागृहातील एकाच कर्मचाऱ्याकडे चाव्यांचा जुडगा असतो. कारागृहातील सर्व किल्ल्या सुरक्षित आहेत. त्यामुळे पसार झालेल्या रितेश कदम व किरण मोरे या दोन्ही आरोपींनी हुबेहूब बनावट चावीचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी पोलिसांप्रमाणेच आमच्या खात्याकडूनही या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत याप्रकरणी दोषींवर कारवाई शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
आठ पोलीस संशयाच्या भोवऱ्यात
By admin | Updated: June 28, 2014 00:18 IST