रत्नागिरी : गेटवे आॅफ रत्नागिरी म्हणून प्रसिध्द असलेल्या शहरातील मांडवी बंदर किनाऱ्यावर जेटीच्या प्रवेशद्वारावरच गटाराचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. हे काळे-निळे घाणेरडे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले असून, त्यामुळे येथे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील गटारातून सेप्टीक टॅँकचे पाणीही किनाऱ्यावर वाहून येत असल्याने या बंदरावर ये-जा करणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आाहे. त्यामुळे हे घाणीचे साम्राज्य तत्काळ दूर करण्याची मागणी शहरवासीयांतून केली जात आहे. तालुक्यातील गणपतीपुळे, पावस व अन्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना रत्नागिरीत वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरातील मांडवी जेटी व बंदर येथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, या जेटीवर असलेले पथदीप तुटून फुटून गेले आहेत. जेटीच्या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यातच मांडवी परिसरातील सर्व इमारतींचे सांडपाणी व प्रसाधनगृहांच्या टाक्यांचे घाणपाणीही या गटारात सोडले जात आहे. हे गटार मांडवी बंदर जेटीच्या प्रवेशद्वारापाशीच असून, तेथून चौपाटीवर सर्वत्र हे घाण पाणी पसरले आहे. ही नेहमीचीच समस्या असून, ये- जा करणाऱ्याना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. याच ठिकाणी मेरिटाईम बोर्डाची कार्यालये असून, तेथे मच्छिमारांची नेहमीच ये-जा सुरू असते. त्यामुळे जवळच असलेल्या या दुर्गंधीमुळे कर्मचारी व मच्छिमारांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. पर्यटनवृध्दिसाठी मांडवी किनारा स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असून, याबाबत रत्नागिरी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच प्रवेशद्वारावरील गटाराचे पाणी अन्यत्र नेण्याचीही आवश्यकता आहे. एकीकडे सांडपाण्याची समस्या असतानाच दुसरीकडे मांडवीसारख्या चांगल्या समुद्रकिनाऱ्यावरील बंदर जेटी मोडकळीला आली आहे. अनेक ठिकाणी ही जेटी खचली असून, पर्यटन विकासाच्या माध्यमातून या जेटीचा विकास करून सुशोभिकरण करण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे शहराचे गेटवे असलेल्या मांडवीचा विकास होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
मांडवी बंदराच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य
By admin | Updated: May 29, 2015 23:44 IST