वैभववाडी : तालुका अतिदुर्गम आणि डोंगराळ असून शैक्षणिक सुविधा अपुऱ्या आहेत. खेड्यातील मुलांना शिक्षणासाठी दळणवळणाच्या सोयी नाहीत. त्यामुळे पटसंख्येअभावी तालुक्यातील एकही शाळा बंद करू नये असा ठराव पंचायत समिती सभेत घेण्यात आला. पटसंख्येअभावी आता शाळाबंद केल्या तर भविष्यात त्या त्या वाड्या वस्त्यांवरील मुले शिक्षण प्रवाहातून बाहेर राहू शकतात असेही ठरावात नमूद करण्यात आले.पंचायत समितीची मासिक सभा सभापती नासीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मासिक सभेला उपसभापती बंड्या मांजरेकर, सदस्य मंगेश गुरव, शोभा सुतार, शुभांगी पवार, गटविकास अधिकारी एम. एम. जाधव व खातेप्रमुख उपस्थित होते.सभागृहातील ठराव आणि सूचनांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून होत नसल्याबद्दल सभापती काझी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सभागृहात ठराव मांडताक्षणी संबंधितांनी तांत्रिक मत मांडावे. तसे न करता ते नियमात बसत नाहीत म्हणून कागदावरच ठेवणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे त्यांनी ठणकावले. तसेच पंचायत समिती स्तरावर नवीन लेखाशीर्ष तयार करण्यासंदर्भात ठराव करून तो मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्याची सूचना काझींनी केली.आर्थिक गैरव्यवहार, कामातील अनियमितता, ग्रामस्थांच्या तक्रारी अशा कारणांनी बदनाम ग्रामसेवकांना तालुक्याबाहेर घालवून जिल्हा परिषदेने सहकार्य करावे. वादग्रस्त ग्रामसेवकांमुळे विकासावर परिणाम होत असून नागरीकांची गैरसोय होत आहे अशी मागणी सभेत करण्यात आली. निसर्गाचा लहरीपणा पाहता प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवावे अशी मागणी काझी यांनी केली. तालुक्यातील बऱ्याच अंगणवाडीच्या इमारतींना विद्युत पुरवठा नाही आणि ज्याठिकाणी वीज पुरवठा सुरु आहे त्याचे शुल्क व्यावसायिक दराने केले जात असल्याने ग्रामपंचायतींना ते डोईजड होत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलित योजनेतून अंगणवाड्यांना सौर युनिट पुरविण्याची मागणी प्रकल्प अधिकारी शरद मगर यांनी केली. (प्रतिनिधी)
पटसंख्येअभावी तालुक्यातील एकही शाळा बंद करू नये
By admin | Updated: August 5, 2014 00:04 IST