कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस बंद करून त्या गाडीच्या वेळेप्रमाणे डबलडेकर सोडण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यास शिवसेनेच्यावतीने रेल्वे रेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. हर्षद गावडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन रविवारी रेल्वे स्टेशन मास्तरांकडे सादर करण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, जनशताब्दी एक्स्प्रेसचे तिकीट दर डबलडेकर गाडीच्या तुलनेत खूपच कमी आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे हे तिकीटदर आहेत. प्रवाशांची संख्या पाहता जादा गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असलेली जनशताब्दी एक्स्प्रेस बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. याला सिंधुदुर्ग युवा सेनेचा तीव्र विरोध आहे.कोणत्याही परिस्थितीत कोकण रेल्वे मार्गावरील एकही गाडी बंद करू नये. नव्याने सुरु केलेली डबलडेकर गाडी नियमित करून तिचे तिकीट दरही कमी करावेत. रेल्वे तिकिटांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक रेल्वेमध्ये महिला व पुरुष सुरक्षा रक्षक नेमावेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने सुरक्षा यंत्रणेला संपर्क करण्यासाठी विशेष संपर्क क्रमांकही सुरु करण्यात यावेत. या मागण्यांची रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास शिवसेना खासदार विनायक राऊत व जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेतर्फे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर व मार्गावर रेलरोको आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, रविवारी येथील रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरना युवा सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, अजित काणेकर, रिमेश चव्हाण, अमित लोखंडे, शहरप्रमुख मंदार सोगम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
रेल्वे रोको आंदोलन करणार
By admin | Updated: September 7, 2014 23:19 IST