पुरळ : खेळाडूंची निवासस्थाने व पाण्याची चोख व्यवस्था ठेवा. नियोजनात कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी येता कामा नयेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची वातावरणनिर्मिती करण्यास सुरूवात करा. प्रत्येक तालुक्यात एक बॅनर याप्रमाणे किमान २० बॅनर लावून स्पर्धेची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी, अशी सूचना ई. रविंद्रन यांनी केली. जामसंडे येथील सांस्कृतिक क्रीडांगणावर ७ मार्चपासून राज्य शासनाची शिवशाही कबड्डी स्पर्धा सुरू होत असून जिल्हाधिकारी ई. रविंंद्रन यांनी मंगळवारी कबड्डी स्पर्धेतील मैदानाची पाहणी करून स्पर्धा नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासन, कबड्डी फेडरेशन व सन्मित्र मंडळ या स्पर्धेच्या जय्यत तयारीला लागले आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने तालुक्यात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी ई. रविंंद्रन यांनी जामसंडे सांस्कृतिक भवन येथे जिल्हा कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष अॅड. अजित गोगटे, जिल्हा क्रीडा अधिकारी दीक्षित यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छाया नाईक, तहसीलदार जीवन कांबळे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक अरविंंद बोडके यांच्यासह आरोग्य विभाग, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, विद्याधर माळगांवकर, जामसंडे सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुरी, अॅड. अभिषेक गोगटे, नरेंद्र भाबल, प्रशांत वारीक, चंदू पाटकर आदी उपस्थित होते. स्पर्धा कालावधीत पोलीस बंदोबस्त ठेवा, पाणीपुरवठा व्यवस्थित करावा, अशा सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत इळये व मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन टीम कार्यरत ठेवण्यात येणार असून अॅम्ब्युलन्स सेवाही ठेवण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी सांगितले. (वार्ताहर)
नियोजनाबाबत तक्रारी नका
By admin | Updated: February 25, 2015 00:12 IST