रत्नागिरी : प्रत्येक विभागाकडील अपूर्ण कामांबाबत जातीने लक्ष घालून जिल्हा परिषदेच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांना दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी जिल्हा परिषदेच्या विविध मागण्यांबाबत पालकमंत्र्यांशी स्वत: संपर्क साधून चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठकीसाठी शुक्रवारी वेळ दिला होता. या बैठकीला अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम, सर्व सभापती व काही सदस्य आणि सर्व विभागप्रमुख सहभागी झाले होते. सन २००९-१०, २०११-१२ या आर्थिक वर्षात तेराव्या वित्त आयोगातून अंगणवाडीसाठी प्राप्त झालेले सहा कोटी ४५ लाख रुपये पडून आहेत. या रकमेच्या खर्चाच्या मंजुरीसाठी, जिल्हा परिषदेची वर्ग-१, वर्ग-२ ची पदे दीड ते दोन वर्षे रिक्त आहेत. विंधन विहिरी खुदाईच्या नवीन दराची मान्यता मिळविण्यासाठी, लघुपाट-बंधाऱ्यांच्या प्रस्तावित ५३ बंधाऱ्यांसाठी पाच कोटी ७५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांची २१ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद निवड समितीचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आणि सर्व सभापती समिती सदस्यपदी असावेत, बदल्यांचे अधिकार अध्यक्ष, सभापतींना देण्यात यावेत, अशा विविध मागण्या या बैठकीत अध्यक्ष राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी काळम यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या मागण्यांबाबत सखोल चर्चा केली. संबंधित विभागाशी स्वत: चर्चा आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार करून मागण्या मार्गी लावणार असल्याचे पालकमंत्र्यानी जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांना आश्वासन दिले. (शहर वार्ताहर)
जि. प.च्या मागण्यांचा पाठपुरावा : वायकर
By admin | Updated: March 22, 2015 00:33 IST