सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्धर आजाराने पिडीत असलेल्या २० लाभार्थ्यांना २ लाख ८९ हजार ४९३ रुपयांच्या धनादेशाचे वाटप सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात अद्यापपर्यंत १२४ दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या लाभार्थ्यांना १४ लाख ४६ हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत.दुर्धर आजाराने पिडीत असलेल्या रुग्णांना जिल्हा परिषदेमार्फत जास्तीत जास्त १५ हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते. यामध्ये हृदयविकार, किडनी यासारख्या आजार असणाऱ्या रुग्णांनाच ही मदत लागू असून त्या संबंधित लाभार्थ्यांनी आजार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आज जिल्ह्यातील २० लाभार्थ्यांना २ लाख ८९ हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. ते धनादेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अधिकारी उपस्थित होते. या २० प्रस्तावांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ३१ जानेवारी रोजी मंजुरी दिली होती. त्याचे वितरण सोमवारी करण्यात आले. लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये अश्विनी ओटवकर (ओटव), उर्मिला माळकर (फोंडा), कृष्णांत माळकर (कणकवली), शांताराम गुरव (आशिये), जीजी चव्हाण (सांगवे), रामा कोकरे (मठ), चंद्रकांत पेडणेकर (कोंडुरा), वैजयंती तर्फे (कुवळे), गणपत लोके (मिठबांव), वृषाली इळकर (महान), सरस्वती पुजारे (राठीवडे), दर्शन सावंत (हेदूळ), नारायण परब (वायरी), जयश्री बालम (कसाल), रविंद्र साटम (वेताळ बांबर्डे), ज्ञानदेव सावंत (वेताळ बांबर्डे), भाग्यश्री परब (ओरोस), सुरेखा नाईक (भडगाव), सखाराम खरात (पांग्रड) यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश तर स्मिता बरगडे (हिर्लोक) यांना ४४९३ रुपयांचा धनादेश याप्रमाणे २ लाख ८९ हजार ४९३ रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. (प्रतिनिधी)
साडेचौदा लाखांचे वितरण
By admin | Updated: February 24, 2015 00:01 IST