कणकवली : सिंधुदुर्गात दिवसेंदिवस राजकीय घडामोडी वाढत असून त्या पार्श्वभूमीवर कणकवलीसारख्या संवेदनशील भागात होर्डिंग्जची संख्या वाढती आहे. होर्डिंग्ज लावण्यावर नगरपंचायत प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कणकवली पोलिसांनी नगरपंचायतीला नोटीस देऊन होर्डिंग्जवर नियंत्रण आणण्यास सांगितले असल्याचे समजते. राजकीय नेत्यांना शुभेच्छा आणि विविध प्रसंगानुरूप होर्डिंग्ज लावले जातात. कणकवलीत मुख्य चौकात आणि इतरत्र मोठे होर्डिंग्ज लावले जातात. होर्डिंग्जच्या आकाराची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र असते. होर्डिंग्ज लावण्याआधी कणकवली नगरपंचायत प्रशासनाची त्याचबरोबर जागा मालकाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, या गोष्टींना फाटा दिला जात असून मनमानी सुरू असल्याचे दिसते.जितके दिवस परवानगी आहे त्या मुदतीनंतर तातडीने हे होर्डिंग्ज उतरवून घेण्याची जबाबदारी संबंधित होर्डिंग्ज लावणाऱ्याची असते.अनेकदा होर्डिंग्ज कसेही लावले जात असल्याने वाहनधारकांना, पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. कणकवलीत एका स्थानिक नेत्याच्या वाढदिवसानिमित्त फूटपाथवरही होर्डिंग्ज उभे करण्यात आले होते. अशावेळी राजकीय दबावापोटी प्रशासन मूग गिळून गप्प असते. कणकवली पोलिसांकडूनही होर्डिंग्जवर नियंत्रण आणण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या असल्याचे समजते. होर्डिंग्ज फाडणे अथवा विद्रूपीकरण केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून नगरपंचायतीला होर्डिंग्जसंदर्भात ही नोटीस देण्यात आल्याचे समजते. नगरपंचायत प्रशासनाकडून होर्डिंग्जबाबत ठोस कार्यवाहीची गरज आहे. (प्रतिनिधी)
कणकवलीत होर्डिंग्जलाअनिर्बंध
By admin | Updated: July 20, 2014 22:12 IST