चौके : मालवण तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या धामापूर तलावातील इको फ्रेंडली बोटिंग प्रकल्प बोटिंच्या नादुरुस्तीमुळे आणि तरंगत्या जेटीच्या समस्येमुळे वर्षभर पूर्णपणे बंद होता. हा प्रकल्प माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या प्रयत्नातून २१ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला. याचा प्रारंभ धामापूरमधील उद्योजक शिरीष देसाई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष चव्हाण, धामापूर सरपंच मानसी धामापूरकर, भक्ताई स्वयंरोजगार सहकारी संस्था धामापूरचे अध्यक्ष तुषार धामापूरकर, प्रकल्प समन्वयक महेश धामापूरकर, ग्रामस्थ नंदकिशोर परब, बापू देसाई, संदीप राऊळ, ओंकार मेस्त्री, आत्माराम धामापूरकर, सीताराम धामापूरकर, सागर धामापूरकर, आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर धामापूर तलाव आणि परिसर निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेसचे आमदार सुभाष चव्हाण तसेच पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून लाखो रुपये किमतीचा इको फ्रेंडली बोटिंग प्रकल्प सन २०१० मध्ये सुरू करण्यात आला. सुरुवातीची तीन वर्षे हा प्रकल्प अजिंक्य अॅडव्हेंचर अँड हेल्प आॅर्गनायझेशन या संस्थेकडे चालविण्यासाठी देण्यात आला. त्यावेळी तरंगती जेटी पॅडल बोटी, मोटरबोटी सुस्थितीत असल्यामुळे बोटिंग सेवा सुरळीत चालली. तसेच याला पर्यटकांनीही चांगला प्रतिसाद देऊन संस्थेने उत्पन्नही चांगले मिळविले. परंतु, त्या तुलनेत बोटिंची निगा न राखल्यामुळे अजिंक्य अॅडव्हेंचरचा तीन वर्षांचा करार संपल्यानंतर या बोटिंग प्रकल्पाला खऱ्या अर्थाने उतरती कळा लागली. यावेळीही सुभाष चव्हाण यांनी पुढाकार घेऊन बोटींच्या दुरुस्तीसाठी वैयक्तिकरित्या खर्च करून हा प्रकल्प धामापुरातील स्थानिक तरुणांच्या भक्ताई स्वयंरोजगार सहकारी संस्था धामापूर या संस्थेकडे दोन वर्षांपूर्वी चालविण्यास देण्यात आला. या संस्थेने पर्यटकांना एक हंगाम बोटिंग सेवा उपलब्ध करून दिली. परंतु, पावसाळ्यानंतर पुन्हा हा प्रकल्प बोटींच्या नादुरुस्तीमुळे बंद अवस्थेत होता. तसेच तरंगत्या जेटीचीही समस्या निर्माण झाली होती. (वार्ताहर)चौकट-फॅमिलीसाठी मोटारबोट लवकरच सुरू करणारयावेळीही पुन्हा सुभाष चव्हाण यांनी पुढाकार घेऊन बोटींच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये देऊन पाच पॅडलबोट पुन्हा सुरू करून घेतल्या आणि तरंगती जेटी जोडून घेऊन पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेली इको फ्रेंडली बोटिंग सेवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु करून घेतली. त्याचप्रमाणे अजून एक पॅडलबोट आणि फॅमिलीसाठी असणाऱ्या दोन बॅटरीवर चालणाऱ्या मोटारबोटी येत्या १५ दिवसांत सुरु करण्यात येतील, अशी माहिती प्रकल्प समन्वयक महेश धामापूरकर यांनी यावेळी दिली.
धामापूरचा बोटिंग प्रकल्प पुन्हा सुरू
By admin | Updated: March 23, 2015 00:41 IST