रत्नागिरी : स्नेहबंधचा उपक्रम स्तुत्य असून, विभागातील सर्व कर्मचारी एकत्र येतात. नियमित काम करताना येणारा ताण तणाव दूर होऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे प्रेरणा मिळते. परिणामी प्रशासनात गती येते, असे प्रतिपादन विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील वाहतूक शाखेतर्फे स्नेहबंध कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांनी पुरूष कर्मचाऱ्यांचे पारंपरिक पध्दतीने औक्षण केले. त्यानंतर पुरूष मंडळींनी महिला भगिनींना भाऊबीज म्हणून साड्यांचे वितरण केले. या कार्यक्रमाला मुंबई विभाग वाहतूक नियंत्रक डी. के. कुरतडकर, विभागीय लेखाधिकारी संदीप हरणे, विभागीय सांख्यिकी अधिकारी दीपिका कुंडले, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी एस. एच. सुर्वे, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत आदी उपस्थित होते.प्रारंभी एस. व्ही. राजहंस यांनी गाणे सादर केले. त्यानंतर सर्व महिला भगिनींना भाऊबीज वाटप करण्यात आले. प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी एस. एच. सुर्वे यांनी मार्गदर्शन करताना डी. के. कुरतडकर यांच्या संकल्पनेतून संबंधित कार्यक्रम राबविण्यात येत असून, महिला कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, हाच उद्देश असल्याचे विशद केले. हा उपक्रम स्तुत्य असून, अन्य विभागामध्येही अशा प्रकारचा उपक्रम सुरु करण्यात यावा, अशी सूचना राजलक्ष्मी सुर्वे यांनी केली. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.मुंबई विभाग नियंत्रक डी. के. कुरतडकर यांनी राजापूर आगारापासून या कार्यक्रमाला सुरुवात केली. कोल्हापूर विभागातदेखील या कार्यक्रमाला प्रतिसाद लाभला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जवळीक निर्माण होऊन काम सहजसुलभ होते. ताणतणाव नष्ट व्हावा, या हेतूने व महिला भगिनींना सुरक्षितता मिळावी, यासाठी स्नेहबंध सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)
‘स्नेहबंध’मुळेच सलोखा : देशमुख
By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST