रत्नागिरी : महाराष्ट्रातून ४१ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक आंबा निर्यात होतो. रोजगार हमी योजनेंतर्गत १८ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असले तरी ते उदरनिर्वाहासाठी असून, आंबा हे पैसे मिळवून देणारे पीक आहे. शेतकऱ्यांनी आंबा उत्पादकतेबरोबर निर्यातीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्य कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले.कृषी विभाग आणि फलोत्पादन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंबा निर्यातीच्या संधी व आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेंकटश्वरलू, केंद्र शासनाचे प्लँट प्रोटेक्शन अॅडव्हायजर डॉ. सुशील, अपेडाचे संचालक डॉ. ए. एस. रावत, उपमहाव्यवस्थापक डॉ. सुधांशू, रिजनल प्लँट क्वारंटाईन मुंबईचे डॉ. जे. पी. सिंग, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार काळम-पाटील, पणन विभागाचे मिलिंद जोशी, पर्णिका बुरांडे, शास्त्रज्ञ डॉ. बुरोणकर, जिल्हा कृषी अधीक्षक सी. एस. गायकवाड उपस्थित होते. युरोपिय देशांनी फळमाशीचे कारण देत काही अटी ठेवत निर्यातीवरील बंदी उठविली असली तरी भाजीपाला निर्यातीवील बंदी कायम ठेवली आहे. आंब्यावर सुमारे ६० मिनिटे ४० अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यावर आंब्याच्या दर्जावर काही परिणाम होईल का, याबाबत संशोधन सुरू आहे. परंतु भविष्यात निर्यात अखंड राहण्यासाठी आंबा लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कीटकनाशक फवारणी, फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी फायटोसॅनेटरी प्रमाणपत्राची उपलब्धता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेळोवेळी शास्त्रीयदृष्ट्या माहिती देण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. यावेळी ‘आंबा निर्यात संधी व आव्हाने’ मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. एस. एस. अडसूळ यांनी प्रास्ताविक केले. अपेडाचे संचालक डॉ. ए. एस. रावत यांनी हापूसचा दर्जा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.केंद्र शासनाचे वनस्पती संरक्षण सल्लागार सुशील यांनी आंब्याचे एक हजार प्रकार असले तरी निर्यात कमी आहे, असे सांगितले. मँगोनेट प्रमाणपत्र डॉ. विवेक भडे व नरहरी वैद्य यांना वितरीत करण्यात आले. सूत्रसंचालन आरीफ शहा व मनीषा शहा यांनी केले. विभागीय कृषी संचालक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आंबा उत्पादनाबरोबर निर्यात वाढ हवी : देशमुख
By admin | Updated: February 25, 2015 00:11 IST