आंबोली : चौकुळ येथील बेरड समाजाला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून इंदिरा आवास योजनेखाली घरकुले मंजूर करण्यास विलंब होत आहे. बेरड समाजातील लोकांना तत्काळ घरकुले मंजूर करावीत. अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा चौकुळ ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव गावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्ह्यात बेरड समाज हा केवळ चौकुळ या गावातच आढळतो. त्यांचे नातेवाईक कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यात आहेत. हा समाज आदिवासी जीवन जगत असून तो त्याच प्रवर्गात मोडतो. परंतु त्यांना जातीविषयी पुरावे न देता आल्याने अद्याप त्यांचे दाखले शासनाकडे प्रलंबित आहेत. हा समाज अशिक्षित असल्याने त्यांंना नोकरीधंदा नाही. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांची घरे ही गवताने आणि कच्च्या मातीने उभी केलेली आहेत. परंतु ही घरे राहण्यायोग्य नसून एकाच झोपडीत चार-चार कुटुंबे रहात असल्याने वृद्ध, महिला, बालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे चौकुळ ग्रामपंचायतीने त्यांना बेघर यादीत सामाविष्ट करून त्यांना इंदिरा आवास योजनेतून घरकुल मिळण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तसेच त्यासाठी आवश्यक असणारी जमीन गावठण नोंद करून हे सर्व प्रस्ताव सावंतवाडी पंचायत समितीतर्फे जिल्हा परिषदेस सादर केले. परंतु जिल्हा परिषदेकडून शासनाची घरकुले मंजूर करण्याचे उद्दिष्ट कमी असल्याचे कारण पुढे करून गरजू बेरड समाजाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे बेरड समाजातील बेघर लोकांना तत्काळ इंदिरा आवास योजनेतून घरकुले मंजूर करण्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेला द्याव्यात, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. अन्यथा १५ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरड समाजातील लाभार्थ्यांसह उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, सावंतवाडी गटविकास अधिकारी, सावंतवाडी पंचायत समिती सभापती यांना सादर केली आहे. (वार्ताहर)
बेरड समाजाला घरकुल देण्यास विलंब
By admin | Updated: August 7, 2014 00:29 IST