महेश सरनाईक- कणकवली -लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात इतिहास रचला गेला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल, अशा काहीशा भावनेतून राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळची परिस्थिती पाहता केसरकरांना विधानसभा निवडणूक सोपी जाईल, त्यांचा विजयाचा मार्ग सुकर असेल वाटत होते. मात्र, दिवसेंदिवस राजकीय परिस्थितीमध्ये मोठे फेरबदल होत असल्याने केसरकरांसमोरील अडचणीत वाढ होत आहे.गेल्या चार दिवसांत माजी आमदार केसरकर यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी चक्रव्यूह रचायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचे कट्टर समर्थक आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे संकेत दिल्यामुळे केसरकरांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात असतानाच केसरकरांसमवेत शिवसेनेत दाखल झालेले दोडामार्गमधील नेते सुरेश दळवी यांच्याकडून राष्ट्रवादीत स्वगृही परतण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांना केसरकरांविरोधातच सावंतवाडी मतदार संघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे केसकरांसाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.सावंतवाडी मतदार संघात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे. यातील सावंतवाडी शहरात केसरकरांची मोठी ताकद आहे. कारण सावंतवाडी पालिकेवर त्यांचे समर्थक नगरसेवक निवडून आले आहेत. या सतरा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांनी आपण शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे केसकरांसमवेत जाणार नसल्याने सावंतवाडी पालिकेतही फूट पडली आहे. दुसरीकडे दोडामार्गमधील राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांनी केसरकरांसमवेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले होते. मात्र, त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारीच देऊ केल्याने ते स्वगृही परतण्याच्या मनस्थितीत आहेत. तसे झाल्यास तो मोठा धक्काच म्हणावा लागेल. कारण दोडामार्ग तालुक्यात सुरेश दळवी यांचा एकछत्री अंमल आहे. सुरेश दळवी विरोधात गेले तर केसकरांसमोर मोठे संकट असणार आहे.दुसरीकडे वेंगुर्ले नगरपालिकेतही केसकरांमुळे दोन गट पडले आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक केसकरांच्या विरोधात आहेत. केसकरांमुळे आपल्याला अपात्र व्हावे लागले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीतही शिवसेना विरूद्ध काँग्रेस आघाडी यांच्यामध्ये टाय झाली होती. त्यात चिठीव्दारे केसरकर समर्थक सदस्याला सभापतिपदाचा मान मिळाला असला तरी येथील जनमत आता केसरकरांच्या विरोधात जाण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे वेंगुर्ले पालिका आणि तालुक्यातील नागरिक केसकरांसमवेत कितपत राहतात, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे तिन्ही बाजूंनी दीपक केसरकर अडचणीत सापडले आहेत. त्यातून ते आता कसे मार्ग काढतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहेत.त्यातच शिवसेना - भाजपाची युती झाली नाही तर सावंतवाडी मतदार संघात प्रत्येक पक्षाचा एक आणि काही अपक्ष असे मिळून सहा उमेदवार रिंगणात असणार आहेत. एकंदरीत पहिल्यांदा सावंतवाडी मतदारसंघात काहीशी एकतर्फी वाटणारी लढाई आता त्यामुळे सावंतवाडीतील लढत लक्षवेधी आणि जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक आणि सर्वाधिक चुरशीची होणार आहे.
दीपक केसरकरांची वाट बिकट
By admin | Updated: September 23, 2014 00:17 IST