सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांनी जिल्ह्यात पक्षात गटतट निर्माण करण्यापेक्षा शिवसेनेत खुशाल जावे, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना दिला. अपमानाचे सांगतात, मग ते सन्मानाचे का सांगत नाही? असेही ते म्हणाले.जितेंद्र आव्हाड यांनी आज, मंगळवारी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार राजन तेली, अबिद नाईक, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, प्रसाद रेगे, मनोज नाईक उपस्थित होते.मंत्री आव्हाड म्हणाले, आमदार दीपक केसरकर हे माझ्या दौऱ्यात नाहीत. कदाचित ते कुठल्या तरी कामात असतील; पण माझ्या दौऱ्याची कल्पना जिल्हाधिकारी व सर्व आमदारांना दिली होती. त्यामुळे ते का आले नाहीत, हे माहीत नाही. केसरकरांना पक्षातून निलंबित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मालवण पोटनिवडणुकीत तसेच जिल्हा परिषदेच्या एका जागेवर काँग्रेस विजयी झाली. या निवडणुकांंच्या एबी फॉर्ममध्ये काही घोळ झाला होता; पण तो आता सुटला असून हा विषयही आता इतिहासजमा झाला आहे. यापुढे पक्षाचे काम सुरळीत होईल, असे मत त्यांनी यावेळी मांडले.विधानसभेची रणनीती आम्ही तीन महिने अगोदर जाहीर करणार नाही. काँग्रेसने सावंतवाडीचा मतदारसंघ मागितला असला, तरी अद्यापपर्यंत चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दीपक केसरकरांबाबत जास्त बोलण्यास आव्हाड यांनी नकार दिला. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न लवकरच सोडवू. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
दीपक केसरकरांनी खुशाल शिवसेनेत जावे
By admin | Updated: July 1, 2014 23:58 IST