कुडाळ : तालुक्यातील राष्ट्रवादीच्या केसरकर गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक आयोजित करत अजित पवार यांना भेटून पुढील निर्णय घेण्याचा ठराव केला आहे. आमदार केसरकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने कार्यकर्त्यांना कोणती भूमिका घ्यायची याबाबत साशंकता निर्माण झाल्याने पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत पवारांच्या भेटीनंतर निर्णय घेण्याचे ठरविले आहे.राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेना पक्षात जाणार असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात केसरकर गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी कुठे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांमध्येही याबाबत साशंकता दिसून येत आहे. कुडाळ तालुक्यातील केसरकर गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील भूमिका ठरविण्यासाठी तातडीची सभा घेतली.या सभेला मत्स्योद्योग महामंडळाने उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, दादा बेळणेकर, प्रफुल्ल सुद्रीक, जिल्हा परिषद सदस्या रेवती राणे, संदीप राणे व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केसरकर पक्षाच्या राजीनामा देणार असल्याने आपली भूमिका कोणती असावी, याबाबत चर्चा झाली. यामध्ये येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्यानंतर निर्णय घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठक सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी शिवराम दळवी यांनी उपस्थिती दर्शवित अंदाज घेतला. यामुळे मध्यस्थी तालुक्यातील केसरकर गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)
अजित पवारांच्या भेटीनंतरच निर्णय
By admin | Updated: July 14, 2014 23:35 IST