वैभववाडी : वैभववाडी शहरात गोपाळनगरसमोर राहणारा शिवाजी रघुनाथ पाटील (वय ४०) याने घराच्या पडवीत पेटवून घेतले. यामध्ये तो पूर्णत: भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेजाऱ्यांनी धावपळ करून आगीपासून घर वाचविले.तालुक्यातील नावळे मुळगाव असलेल्या शिवाजीचे वडील रघुनाथ विष्णू पाटील यांचे घरातच किराणा मालाचे लहानसे दुकान आहे. त्यामुळे तेथेच त्यांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. शिवाजी काही वर्षांपूर्वी संजय सावंत यांच्या मेडिकलमध्ये कामाला होता. मात्र गेल्या दीड- दोन वर्षांपासून घरातच कपड्यांना इस्त्रीचा व्यवसाय करीत होता. घरात आजारी वडील, आई, पत्नी व ४ वर्षाच्या मुलासमवेत राहत होता.सायंकाळी पत्नी मुलाला क्लासला घेऊन गेल्याची संधी साधून शिवाजीने घराच्या पडवीतील दरवाजाला कडी घालून रॉकेलने पेटवून घेतले. त्याच्या घरातून धूर रस्त्यावर दिसू लागल्याने शेजाऱ्यांनी धावपळ केली. मात्र आतून कडी असल्याने त्याला वाचवू शकले नाहीत. त्याने पेटवून घेतल्याने लाईटचे वायरींग, माळ््याच्या फळ््याही पेटल्या. मात्र शेजाऱ्यांनी पाण्याचा मारा करून घर वाचविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय साबळे, उपनिरीक्षक गवस, बागुल, कदम, राठोड आदी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पूर्ण जळलेल्या स्थितीत शिवाजीचा मृतदेह दृष्टीस पडला.त्याच्या घराबाहेर व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. (प्रतिनिधी)
वैभववाडीतील तरुणाचा पेटवून घेतल्याने जागीच मृत्यू
By admin | Updated: August 17, 2014 00:22 IST