शिरीष नाईक-कसई दोडामार्ग -विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरी आघाडी आणि महायुतीमध्ये ठाण निर्णय न झाल्याने उमेदवार कोण, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राजन तेली, परशुराम उपरकर व दीपक केसरकर यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक सुरेश दळवी यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षांची भेट घेतली. उमेदवारी मिळाल्यास इच्छुक असल्याचे सांगितल्याने या निवडणुकीत रंगत आलेली आहे. दोडामार्ग तालुका पंचायतीवर भाजपा-शिवसेनेचे वर्चस्व आहे. याचा फायदा केसरकर यांना होईल, असे वाटत असले, तरी सुरेश दळवींचे त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार दीपक केसरकर निवडून आले होते. त्यांच्या विरोधात सेना-भाजपाचे उमेदवार शिवराम दळवी यांचा पराभव झाला होता. तरीही पंचायतीवर मात्र सेना-भाजपने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करून पंचायत समिती आपल्या ताब्यात घेतली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. पालकमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना संपली, असे वाटत असतानाच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करून सेना-भाजपची ताकद वाढविली. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीमध्ये आला. त्यापासून तालुक्यात काँग्रेस कमी होत गेली. पदाधिकारी कामे न करता गप्प बसले आणि आलेली विकासकामे अर्धवट तसेच निकृष्ट झाल्याने मतदार आघाडीवर नाराज आहे. कसई दोडामार्ग सासोली जिल्हा परिषद गटावर भाजप - शिवसेनेचे वर्चस्व आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर येथून निवडून आले. त्याचबरोबर माटणे व कसई दोडामार्ग पंचायत समितीवर उमेदवार निवडून आले. एकनाथ नाडकर्णी व जनार्दन गोरे यांनी सेना-भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेमुळे नाराज असून, या भागातून युतीला मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे. या भागात काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने काही प्रमाणात मतदान काँग्रेसच्या बाजूने जाणार आहे. कोनाळ जिल्हा परिषद मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, काँग्रेसचे काही युवक पदाधिकारी व पंचायत समिती सभापती महेश गवस यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या भागात आघाडीला व महायुतीला समान फायदा होणार, असे मानले जात आहे. राजन तेली व परशुराम उपरकर यांनी तालुका पिंजून काढला. मात्र, महायुतीचे संभाव्य उमदेवार दीपक केसरकर हे तगडे उमेदवार मानले जात आहेत. काही जुन्या शिवसैनिकांना विश्वासात न घेता प्रचार करीत असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. खासदार राऊत यांनी निवडून आल्यानंतर मतदारांचे आभारही मानले नाहीत. त्यांनाही तालुक्याचा विसर पडल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. याचा परिणाम मतदानावर निश्चित होणार आहे. केसरकरांचे खंदे समर्थक सुरेश दळवी हे शिवसेनेत गेले होते. मात्र, त्यांना आघाडीतर्फे तिकीट निश्चित केल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. दळवी हे स्थानिक उमेदवार आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मतांची विभागणी होणार आहे. तसेच तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याने त्याचा फटका केसरकर यांना बसू शकतो. परंतु ही सर्व कागदावरची गणिते आहेत. मात्र, युती तुटल्यास यावेळी उमेदवार कोण, हे न बघता तालुकावासीय स्थानिक उमेदवाराला पाठिंबा देतील, असाही मतप्रवाह आहे.
दळवींचा यू टर्न केसरकरांसाठी घातक
By admin | Updated: September 25, 2014 00:21 IST