वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात समुद्र किनारपट्टीलगतच्या गावात पर्यटन व्यवसायवृद्धीकरीता सी. आर. झेड. कार्यशाळा येत्या १0 दिवसात वेंगुर्ले साई मंगल कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येईल, असे आश्वासन वित्त राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.वेंगुर्ले तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाला वाव आहे. वेंगुर्ले तालुक्यातील समुद्र किनारपट्टी लगतच्या रेडी, शिरोडा, सागरतीर्थ, उभादांडा, दाभोली, वायंगणी, निवती, मेढा या ग्रामपंचायत हद्दीतील भागात तसेच नवाबाग, मूठ या भागात मच्छिमारांना मत्स्यव्यवसाय व्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे साधन नाही. त्या लोकांना सी. आर. झेड बाबत मनात भिती असल्याने पर्यटकांकरीता निवास न्याहारी योजना व अन्य जोड उद्योग उभारण्यास भिती निर्माण झाली आहे. पर्यटन जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर येणा-या पर्यटकांना राहण्याची, निवास न्याहरीची सोय नसल्याने पर्यटक नाराज होऊन जातात. किनारपट्टीलगतच्या घरांना घर वाढविण्यास व छोटे रुम निर्माण करुन निवास व न्याहारीसाठी परवानगी शासनाने दिल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळून त्यांचे उत्पन्नही वाढेल. त्यादृष्टीने सर्व संबंधित खात्यांच्या अधिका-यांची मालवण - देवबाग येथे जशी बैठक आयोजित करुन व्यावसायिक व नागरीकांना सी. आर. झेड. बाबत व निवास न्याहारी चालू करण्याबाबत माहिती देण्यात आली. तशीच माहिती वेंगुर्ले तालुक्यातील मच्छिमार व पर्यटक व्यावसायीक, निवास-न्याहारी व्यावसायीक यांना माहिती दिली जावी अशी मागणी राज्याचे वित्त, पर्यटक व ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर यांचेकडे शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश नाईक, नेते शिवाजी कुबल, सचिन वालावलकर, विवेक आरोलकर, राजू वालावलकर, सुकन्या नरसुले, सुचिता वजराठकर, श्वेता हुले, सतिश हुले, रमेश नार्वेकर, सुरेश भोसले, उमेश येरम, आनंद बटा, हेमंत मलबारी, रविंद्र नरसुले या शिष्टमंडळाने केली.पर्यावरण समिती अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून येत्या १0 दिवसांत तारीख घेऊन बैठक आयोजित करण्याच्या सूचना केसरकर यांनी दिल्या. (प्रतिनिधी)विविध विभागाचे अधिकारीही राहणार उपस्थित.निवास-न्याहरीसाठी परवानगी दिल्यास रोजगार मिळण्याची आशा.विविध योजनांची माहिती देण्याची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली होती मागणी.इच्छुक व्यावसायिकांनी बैठकीला येण्याचे आवाहन.
वेंगुर्ले येथे होणार सीआरझेड कार्यशाळा
By admin | Updated: July 28, 2015 00:25 IST