सावंतवाडी : सावंतवाडीला सांस्कृतिक भूमी बनविण्यात येणार असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. क्षितीज इव्हेंट व सावंतवाडी नगरपालिका यांच्यावतीने स्व. दिनकर धारणकर स्मृती नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी साळगावकर यांनी सांगितले. ते गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेविका अनारोजीन लोबो, अफरोझ राजगुरू, शर्वरी धारगळकर, अध्यक्ष बाळ पुराणिक, हर्षवर्धन धारणकर, आशुतोष चिटणीस, नितीन कारेकर, संदीप धुरी, आदी उपस्थित होते. १३ फेबु्रवारीपासून नाट्यमहोत्सव सुरू होणार असून, तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दिनकर धारणकर स्मृती दालनाचे उद्घाटन करून होणार आहे. तसेच प्रमुख कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी सुभाष भागवत, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, आदी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी श्री परमेश्वर निर्मित रंग दिनकराचे हा कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी धारणकर यांचे नाट्यक्षेत्रातील योगदान मोठे असून, त्यांची प्रेरणा कायम राखण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करीत असून, या निमित्ताने तीन दिवस कार्यक्रमस्थळी वेगवेगळे कार्यकम होणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सावंतवाडीला सांस्कृतिक भूमी बनविणार
By admin | Updated: February 8, 2015 01:00 IST