कुडाळ : नेरूर- वाघचौडी येथील ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत बांधलेल्या झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत माकड कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या टाकीतील दूषित पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना करण्यात आले. हे दूषित पाणी प्यायल्यामुळे पंधरा ते वीसजणांना तापाची लागण झाली आहे. पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग व नेरूर ग्रामपंचायतीचा दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचे संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्षभरापूर्वी नेरूर वाघचौडी येथील सुमारे १५० कुटुुंबातील ४०० ते ४५० ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, याकरिता शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीतून ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा गेल्या वर्षभरापासून केला जात होता. मात्र, पाण्याच्या टाकीच्या पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दाखविलेला निष्काळजीपणा तसेच नेरूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे येथील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले आहे. वर्षभरापासून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या या टाकीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून झाकण बसवून घेतले नव्हते.टाकी तशीच उघडी ठेवण्यात आली होती. गेले दोन दिवस या टाकीतून येणाऱ्या पाण्याला वास कसा येतो, अशीच चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याला वास येऊ लागल्याने काही ग्रामस्थांनी टाकीवर चढून पाहिले असता त्यामध्ये माकड मृतावस्थेत असलेले आढळले. मृतावस्थेतील माकड कुजल्याने या टाकीत तीन ते चार दिवसांपूर्वी पडले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कोणतीच कल्पना नसलेले ग्रामस्थ तेच पाणी पित होते. पाण्याला वास येऊ लागल्यानंतर याची शहानिशा केल्यानंतर सत्य परिस्थिती ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. दूषित पाणी दोन ते तीन दिवस पिल्याने सोमवारी येथील काही पुरुष, महिला आणि मुलांना तापाची लागण होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले वर्षभर या टाकीवर झाकण नाही. तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला या परिस्थितीला सामोरे जावे लागले, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. या टाकीवर झाकण न बसविता पाणी सोडल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून यामुळे भविष्यात ग्रामस्थ, विशेषत: लहान मुलांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? पाणी पुरवठा विभाग, नेरूर ग्रामपंचायत की ठेकेदार, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे काही ग्रामस्थांनी घरी बनविलेले जेवण टाकून दिले. तसेच परिसरात अन्य विहीर नसल्याने याठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी रूपेश पावसकर, राजू सडवेलकर, जयेश परब, संदीप गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या दूषीत पाण्यामुळे पसरलेल्या साथीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अहवाल वरीष्ठांकडे पाठविणार : नाईकया घटनेबाबबतची योग्य ती माहिती घेण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील अहवाल आपण वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे कुडाळचे गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले.आरोग्य तपासणी सुरू या घटनेची माहिती मिळताच त्या परिसरातील सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरू के ली आहे. अजून काही दिवस दैनंदिन सर्वेक्षण सुरू ठेवणार आहे. येथील पाणी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी आर. एम. कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नेरुरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST