तळवडे : गेले दीड वर्ष तळवडे बाजारपेठेतील तीनआसनी व सहाआसनी रिक्षाचालकात सुरू असलेला वाद सर्व पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, आरटीओ, ग्रामस्थ व प्रवाशांसह सर्व समावेशक बैठकीत बुधवारी मिटविण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटांच्या सहमतीने यावर सर्वमान्य तोडगा निघाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. तळवडे बाजारपेठेत तीनआसनी व सहाआसनी रिक्षा चालकांचा वाद विकोपाला गेला होता. या वादाचा फटका प्रवासी वर्गाबरोबरच वेंगुर्ले मार्गे जाणाऱ्या सर्व तीनआसनी व सहाआसनी रिक्षाचालकांना सहन करावा लागत होता. आठवड्या-आठवड्याने या वादाची ठिणगी उडत होती. त्यामुळे रिक्षा चालकांच्यात एकमेकाबद्दल द्वेष निर्माण होऊन वातावरण कायमच तणावपूर्ण असायचे.हा वाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, परिवहन अधिकारी यू. आर. पाटील, सौरभ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, आरटीओ अधिकारी सौरभ पाटील, तळवडे जिल्हा परिषद सदस्या निकिता जाधव, काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, सरपंच सुप्रिया कुंभार, उपसरपंच गुरुनाथ गावडे, सावंतवाडी तीनआसनी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष सुधीर पराडकर, माजी सरपंच सुनंदा मयेकर, पोलीस पाटील सौदागर शेटकर, बाळू साळगावकर यांच्या उपस्थितीत तळवडे ग्रामपंचायत सभागृहात खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही गटांचे मत पोलीस अधिकारी व आरटीओ यांनी ऐकून घेतले. तसेच प्रवाशांसह ग्रामस्थांचेही मत जाणून घेतले. यावेळी वेंगुर्ले शहराकडे जाणाऱ्या सहाआसनी रिक्षाचालकांनी तळवडे बाजारपेठेत रिक्षा न लावता त्या तळवडे बाजारपेठेजवळच मुरारवाडी येथे वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावर लावाव्यात, असे ठरविण्यात आले. तसेच याठिकाणी रितसर सहाआसनी रिक्षाचालकांना स्थानक मंजूर करून देण्याचे ठरविण्यात आले. या तोडग्यावर सर्वांनी सहमती दर्शविली. त्यानंतर दीड वर्षे सुरू असलेला हा वाद संपुष्टात आला. सिंधुदुर्ग आरटीओ यू. आर. पाटील, सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी तीनआसनी व सहाआसनी रिक्षाचालकांना, नियमांचे पालन करून प्रवासीवर्गाला, ग्रामस्थांना त्रास होणार नाहीत, याची दखल घ्या व व्यवसाय करा. परत वाद निर्माण झाल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ताकीद दिली. (प्रतिनिधी)वाद मिटल्याने समाधानया वादाची सुरूवात दीड वर्षापूर्वी झाली होती. तीनआसनी रिक्षाचालकांचे मत होते की, तळवडे बाजारपेठेत सहाआसनी रिक्षाचालकांनी रिक्षा लावू नये. यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होतो. पण सहाआसनी रिक्षाचालकांना ते मान्य नव्हते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. दर आठवड्याला रिक्षा चालकांची हमरी-तुमरी येथे पहावयास मिळायची. या वादाचा फटका प्रवासीवर्गास बसत होता. शेवटी हा वाद ग्रामपंचायतीकडे गेला. तंटामुक्त समितीतही यावर चर्चा करण्यात आली पण त्याला हवी तेवढी दाद मिळत नव्हती. वाद वाढतच राहिल्याने या मार्गावरील प्रवाशी वाहतूक भितीच्या छायेखाली सुरू होती. पण हा वाद मिटविण्याच्या भूमिकेवर गावातील सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी व ग्रामस्थ मात्र ठाम होते. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने व सर्वमान्य तोडग्याने वाद मिटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. शेवटी सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले.
सर्वसमावेशक बैठक यशस्वी
By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST