मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्यावर दीड महिन्यात तब्बल १५ हजार प्लास्टिक बाटल्या कचरा स्वरूपात जमा करण्यात आल्या. सिंधुदुर्ग किल्ल्यावर तेथील रहिवासी संघाकडून एप्रिल महिन्यानंतर शुक्रवारी पुन्हा साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी प्लास्टिक स्वरूपातील कचरा मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ला परिसरात प्रशासनाने प्लास्टिक बंदी करूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि तेथील सागरी परिसर दुर्मीळ जैवविविधतेने संपन्न आहे. ही जैवविविधता टिकून रहावी व सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छ रहावा, यासाठी पर्यटन हंगामात दर महिन्याला सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी संघाकडून साफसफाईची मोहीम राबवली जाते.शुक्रवारी किल्ला रहिवासी संघाकडून साफसफाई मोहीम राबविताना स्वयंसेवकांना तब्बल १५ हजार प्लास्टिक बाटल्या कचरा स्वरूपात सापडून आल्या. किल्ल्याची तटबंदी, राणीची वेळ, शिवराजेश्वर मंदिर परिसरात प्लास्टिक बाटल्यांचा खच पडलेला होता. किल्ला पसिर व तेथील ४ विहिरींचा गाळ काढताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आढळले. यावेळी मंगेश सावंत, हितेश वायंगणकर, हेमंत वायंगणकर, हनुमंत वायंगणकर, सादिक शेख, नरेश सावंत, सचिन लोके यांच्यासह अन्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दीड महिन्यात १५ हजार प्लास्टिक बाटल्या जमा
By admin | Updated: May 29, 2015 23:57 IST