रत्नागिरी : रत्नागिरी तटरक्षक दलातील नोकरभरतीमध्ये मच्छिमारांना सामावून घेण्यासंदर्भात सागरी मच्छीमार संघटना आक्रमक झाली आहे. सागरी मच्छीमार संघटनेची पहिली बैठक रत्नागिरी येथे पार पडली. बदलत्या काळाबरोबरच मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर रुप धारण करत आहे. त्यादृष्टीने तटरक्षक दलामध्ये नोकरभरती करताना मच्छीमार बांधवांनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. समुद्रामध्ये होणारे प्रदूषण व त्यामुळे होणारे बदल यासंदर्भात मच्छीमारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या बैठकीत मच्छीमारांच्या दृष्टीने आवश्यक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये संघटनेचे कार्य व संघटनेची माहिती अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सागरी पाण्याचे होणारे प्रदूषण व त्यामुळे पाण्यात होणारे बदल यावर चर्चा करून प्रदूषणामुळे मत्स्योत्पादनावर होणाऱ्या विपरित परिणामांची माहिती मच्छिमारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेही बैठकीत चर्चा झाली. डिझेलवरील मूल्यवर्धित कराचा परतावा दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत मिळावा, यासाठीदेखील संघटनेकडून प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शहरातील उद्यमनगर येथे आयोजित बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष अमजद बोरकर, सचिव सुधीर वासावे, उपसचिव महेश नाटेकर, खजिनदार मुश्ताक मुकादम, सदस्य संजय पावसकर, अलंकार महाकाळ, मकबूल जांभारकर, मुकेश लोकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)समुद्रातील प्रदूषणाबाबत मच्छीमारांमध्ये जागरूकता करण्याचा निर्णय.जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवरही करण्यात आली चर्चा.
तटरक्षक दलात मच्छीमारांनाही संधी द्यावी
By admin | Updated: July 29, 2015 22:09 IST