सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सी वर्ल्ड, विमानतळ, रेडी बंदर, महामार्ग चौपदरीकरण, पाटबंधारे प्रकल्प, आंबा, काजू बागायतदारांना पुरेशी नुकसान भरपाई नाही. मच्छिमारांसंदर्भात धोरणात्मक निर्णय नाही, जिल्ह्यातील वाळू, चिरे, खडी यावर वाढलेली रॉयल्टी यामुळे जिल्हा अधोगतीकडे जावू लागला आहे. याला सर्वस्वी जबाबदार भाजप-शिवसेना युती सरकार असून या झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो कार्यकर्ते, शेतकरी, महिलावर्ग उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. पोलीस प्रशासनानेही या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवला होता. मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. ओरोस रवळनाथ मंदिर येथून साडेबारा वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर १ वाजता धडकला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, युती सरकार निष्क्रीय आहे. जिल्ह्याचा विकास करू शकत नाही. जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून केवळ जनतेची विकासाच्या नावाने दिशाभूल करत आहे. रास्त दराचे धान्य, केरोसिन, भात खरेदी, आंबा-काजू नुकसानीबाबत अद्यापही या सरकारने कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचे जीवनावश्यक प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही ते जिल्ह्याचा विकास काम करणार? आता जिल्ह्याचा विकास व्हावा असे वाटत असेल तर काँग्रेस नेते नारायण राणे यांना साथ द्या असे सतीश सावंत यांनी सांगितले. संदीप कुडतरकर म्हणाले, युती सरकार स्थापन झाल्यावर आठ महिने झाले तरी हे सरकार स्थिर झालेले दिसत नाही. केवळ तुंबड्या भरण्यासाठी या सरकारचा कारभार सुरु असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. अस्मिता बांदेकर म्हणाल्या, आश्वासन देऊन या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. हे सरकार जिल्ह्याचा विकास करू शकत नाही. हे गेल्या आठ महिन्यात जनतेला समजले आहे. गेल्या निवडणुकांमध्ये झालेली चूक सुधारून जिल्ह्याच्या विकासासाठी आणि स्वत:च्या भल्यासाठी जिल्हावासियांनी राणे यांच्या पाठिशी रहावे, असाही संकल्प सोडला. (प्रतिनिधी) महत्वाच्या घटना या मोर्चात काँग्रेस नेते नारायण राणे बैलगाडीतून सहभागी झाले होते. युती शासन व पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा ओरोस फाट्यावरून मार्गस्थ झाला. या मोर्चात आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, संदेश पारकर यांच्यासह काही काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यांचाही सहभाग जाणवला नाही. या मोर्चामुळे पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस सक्रीय झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
युती शासनामुळे जिल्हा अधोगतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 23:51 IST