चिपळूण : महाराष्ट्रातील गडकोटांच्या बिकट अवस्थेविषयी अधूनमधून पोकळ हकाट्या ऐकू येत असतात की, आपले गडकिल्ले जतन केले पाहिजेत, पर्यटन वाढवले पाहिजे. परंतु, केवळ अशी ओरड करण्यापेक्षा स्वत: सक्रिय झाल्यावर आपल्या गडकिल्ल्यांवर शिवशाही अवतारु शकते, हे चिपळूण येथील ट्रेकशिरीष संस्थेने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील देवरुखपासून २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निगुडवाडी गावाजवळ महीमतगड वसला आहे. गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ आणि पोलीसपाटील यांच्या सहकार्याने ओंकारेश्वर मंदिरात या संवर्धन मोहिमेचा शुभारंभ झाला. पावसामुळे गडावर गवताचे साम्राज्य वाढल्यामुळे गडाचा दरवाजा लुप्त झाला होता. तसेच काही प्रमाणात तटबंदीची पडझड झाली होती. पाण्याच्या टाक्यांमध्ये प्लास्टिकचे ग्लास व पत्रावळ्या पडल्या होत्या. गडाच्या या उदासिनतेत नवचैतन्य फुलवण्यासाठी ट्रेकशिरीषचे सर्व शिलेदार झपाटल्यासारखे काम करत होते. गडाचा प्रवेशद्वार आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. परिसरातील सर्व प्लास्टिक उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. रांगोळी आणि फुलांनी परिसर सजवण्यात आला. प्रवेशद्वाराला तोरण बांधण्यात आले. प्रवेशद्वारात गडाच्या माहितीचा फलक लावण्यात आला. सुरुवातीला जो किल्ला भकास आणि उदास वाटत होता तिथेच सजावट करण्यात आली. श्रमदानानंतर श्रीधर मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. भारत पवार, आकाश नलावडे, आदित्य सावरे, स्वराज कोळेकर, परेश पिलावरे यांनी किल्ले संवर्धनाबाबत मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष सुधीर माने व इतर सदस्य यांनी या संवर्धन मोहिमेकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या. ज्ञानेंद्र सरफळे यांनी यावेळी गडाचा इतिहास सांगून स्वच्छता मोहिमेचा शेवट झाला, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ट्रेकशिरीषतर्फे महिमतगडाला स्वच्छतेचे तोरण
By admin | Updated: October 13, 2014 23:02 IST