वेंगुर्ले : होडावडा-सुभाषवाडी येथे तुळस येथील वाळू व्यावसायिक महादेव तांडेल व हरिश्चंद्र्र ऊर्फ आनंद तांडेल यांच्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये एक डंपर व एक इनोव्हा या गाड्यांची मोडतोड झाली असून, दोघांनीही परस्परविरोधी तक्रार वेंगुर्ले पोलिसांत दाखल केली आहे. या हाणामारीत दोन्ही गटांकडील लोक किरकोळ जखमी झाले आहेत. तुळस येथील वाळू व्यावसायिक आनंद तांडेल हे होडावडा-सुभाषवाडी येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या आपल्या इनोव्हा (७२३२५) या गाडीत बसलेले असताना महादेव तांडेल व डंपरचालक यांनी आपल्या गाडीवर पाठीमागून डंपर (एम. एच. 0७ क्यू ६४२७) ठोकला व आपणास जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार आनंद तांडेल यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार महादेव तांडेल व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर महादेव तांडेल यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आनंद तांडेल यांच्यासह इतर सहाजणांनी बेकायदा जमाव करून आपणास मारहाण केली. त्यानुसार हरिश्चंद्र तांडेल, विजय रेडकर, रेमनाथ तांडेल, वैभव तांडेल, श्याम प्रभू, दशरथ तांडेल, शांताराम तांडेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी इनोव्हा व डंपर ताब्यात घेतले असून, सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भांडये व सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पाटील करीत आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांत धाव दरम्यान, महादेव ऊर्फ दाजी तांडेल हे भाजपचे पदाधिकारी असल्याने गुरुवारी दुपारी भाजपचे माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, प्रदेश कमिटी सदस्य बंड्या सावंत यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ले पोलिसांत धाव घेतली. दाजी तांडेल यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असून, या प्रकरणात आपण वरिष्ठांपर्यंत जाणार आहे. तसेच तलाठी श्याम प्रभू यांच्या निलंबनासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाळू व्यवसायावरून हाणामारी
By admin | Updated: February 5, 2016 00:52 IST