वैभववाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवार ( दि. १३)च्या कोकण दौऱ्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता रत्नागिरीत, तर दुपारी १२ वाजता कासार्डे येथे मोदींची प्रचार सभा होणार आहे, अशी माहिती आमदार तथा भाजप उमेदवार प्रमोद जठार यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.येथील संपर्क कार्यालयात सायंकाळी आमदार जठार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास सावंत, जिल्हा सरचिटणीस संजय रावराणे, राजू पवार, संदीप राणे, संदीप बांदिवडेकर, आदी उपस्थित होते. आमदार जठार म्हणाले, राज्यातील झंझावाती दौऱ्यातील भाषणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घसा बसल्याने १२ व १३ या दोन दिवसांतील उर्वरित सर्व कार्यक्रम व प्रचारसभा त्यांनी रद्द केल्या. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि सिंधुदुर्गशी असलेल्या ऋणानुबंधामुळेच मोदी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.जठार म्हणाले, पंतप्रधान मोदींचा दौरा सोमवारी सकाळी विमानाने गोव्यात आगमन, तेथून हेलिकॉप्टरने १० वाजता कासार्डे व दुपारी १२.३० वाजता रत्नागिरी असा होता. मात्र, त्यांच्या दौऱ्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता रत्नागिरी व दुपारी १२ वाजता कासार्डेत सभा होईल.दुपारी १ वाजता कासार्डेत त्यांचे भाषण सुरू होईल. दुपारी २ वाजता पंतप्रधान मोदी गोव्याकडे रवाना होतील. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. (प्रतिनिधी)
मोदींच्या कोकण दौऱ्यात बदल
By admin | Updated: October 12, 2014 01:04 IST