नवी दिल्ली/कणकवली : महाराष्ट्रातील नवी मुंबई, चिपी-सिंधुदुर्ग आणि शिर्डी तसेच गोव्यातील मोपा यासह १२ नियोजित विमानतळ प्रकल्पांना केंद्र सरकारने सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. मंगळवारी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल राज्यसभेत ही माहिती दिली. कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, हसन आणि शिमोगा, केरळमधील कुन्नूर, ग्वाल्हेरमधील डाबरा, सिक्कीममधील पाकयाँग, उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि पुड्डूचेरीतील कराईकल येथील नियोजित विमानतळ प्रकल्पांचाही यात समावेश आहे. नोएडातील जेवर विमानतळाच्या विकासाबाबत मात्र कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. चिपी विमानतळ पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात चिपी येथे उभारण्यात येणारा विमानतळाचा प्रकल्प देशविदेशातील पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. गोव्यातील पर्यटकांवर डोळा ठेवून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. गेली ६ वर्षे या विमानतळाचे काम सुरू असून गोव्यातील दाभोळी विमानतळाला पर्याय म्हणून या विमानतळाकडे पाहिले जात आहे. माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकेल. २७१ हेक्टर जागेवर चिपी वाडी आणि परुळे गावादरम्यान उभारल्या जाणाऱ्या या विमानतळासाठी १५0 कोटी खर्च होणार आहेत. गोव्यातील पणजीपासून या विमानतळाचे अंतर केवळ ९0 किलोमीटर आहे. अवघ्या सिंधुदुर्गवासीयांचे डोळे लागून राहिलेल्या चिपी विमानतळ प्रकल्पाचे काम २0१५ साली पूर्णत्वास घेऊन जाण्याचे होते. मात्र अजूनही काम सुरू असल्याने २0१६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी हा विमानतळ प्रकल्प मंजूर होण्यासाठी गेली काही वर्षे काँग्रेस आघाडी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी हा विमानतळ प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
चिपी विमानतळ प्रकल्पाला केंद्राची सैद्धांतिक मंजुरी
By admin | Updated: July 22, 2015 01:09 IST