देवगड : देवगड - कणकवली - वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देवून हा मतदारसंघ विकासाच्या कक्षेत आणणारे आमदार नितेश राणे असून त्यांची संकल्पना, त्यांचा विकास, त्यांचे व्हिजन हे वाखणण्याजोगे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आज देवगड शहरामध्ये स्वखर्चातून आमदार राणे यांनी या ठिकाणी लावले आहेत. यामुळे नितेश राणे यांचा आदर्श देशामध्ये घेतला जाईल आणि देशामध्ये सर्वप्रथम कणकवली विधानसभा मतदारसंघ सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यामध्ये अग्रेसर असणार आहे, असे मत राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील वारंवार होणाऱ्या घरफोडया, चोऱ्या रोखण्यासाठी देवगड, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, देवगड येथे सीसीटीव्ही कॅमेरे उद्घाटनाच्यावेळी उद्घाटक म्हणून खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, देवगड सभापती डॉ. मनोज सारंग, तहसीलदार जीवन देसाई, देवगड पोलीस निरीक्षक बोडके, जिल्हा परिषदेचे वित्त बांधकाम सभापती संजय बोंबडी, उपसभापती स्मिता राणे, बाप्पा फाटक, विष्णू घाडी, अनघा राणे, योगेश चांदोस्कर, प्रकाश राणे, प्रकाश गायकवाड, बाबा परब, व्यापारी संघाचे प्रसाद पारकर, मधुकर नलावडे उपस्थित होते. हा उद्घाटन सोहळा देवगड पोलीस ठाण्यात पार पडला. (प्रतिनिधी)
देशात केवळ कणकवली मतदारसंघात सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 00:43 IST