नांदगाव : कासार्डे ग्रामपंचायत कार्यालय ते सध्याचे पोस्ट आफीस हे अंतर बरेच असल्याने ग्रामस्थांना विनाकारण पायपीट करावी लागते. ती टाळण्यासाठी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते संजय पाताडे यांनी पोस्ट कार्यालय ग्रामपंचायत इमारतीत स्थलांतरीत करण्याचा आग्रह एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. केवळ विरोधासाठी विरोध या प्रवृत्तीमुळे पोस्ट कार्यालय ग्रामपंचायत इमारतीत स्थलांतरीत होऊ शकत नसल्याचा आरोप करीत त्यामुळे कासार्डे ग्रामस्थांच्या नशिबी ही पायपीट सुरूच राहणार, असेही पाताडे यांनी म्हटले आहे.पाताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, कासार्डे ग्रामपंचायतीच्या इमारतीत पोस्ट कार्यालय स्थलांतरीत करण्याबाबत २६ नोव्हेंबर रोजीच्या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली. या सभेत हा विषय चर्चेला येताच पंचायत समिती सदस्य संजय देसाई, दिगंबर लिंगायत व रविंद्र पाताडे हे आक्रमक झाले. पोस्ट स्थलांतरीत करण्याचा विषय ग्रामसभेत पुन्हा पुन्हा येतोच कसा? असा सवाल उपस्थित केला.सध्या कासार्डेचे पोस्ट कार्यालय चंद्रकांत पाताडे यांच्या घरी आहे. त्यामुळे वेळीअवेळी ग्रामस्थांना पोस्टाची सेवा मिळते. याकरिता पोस्ट कार्यालय आहे तिथेच रहावे. पुन्हा हा विषय ग्रामसभेत येता नये, असा इशारा संजय देसाई यांनी दिला व तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामसचिवालयाच्या संकल्पनेनुसार नागरिकांना मुलभूत शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध कराव्यात. शासनाच्या धोरणानुसारच कासार्डे ग्रामपंचायतीची इमारत २०११ साली बांधून पूर्ण झाली. त्याठिकाणी ग्रामपंचायतीसह विविध कार्यकारी सोसायटी व तलाठी कार्यालय आहे. मात्र, इमारतीत गाळे रिकामे असूनही पोस्ट कार्यालय स्थलांतरीत होऊ शकले नाही. पोस्ट कार्यालय ग्रामपंचायत इमारतीत येणार नाही, यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप पाताडे यांनी केला आहे. (वार्ताहर)
पोस्ट कार्यालयासाठी कासार्डेत राजकारण
By admin | Updated: December 2, 2014 00:30 IST