गडहिंग्लज : नगरपालिकेचे सांडपाणी शेतीला वापरण्याचा मक्ता सख्या भावाने घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपा युवराज बरगे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे. अन्यथा, याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू आणि न्यायालयातदेखील दाद मागू, असा इशारा विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला. ‘आक्रमक विरोधक’ आणि ‘शांत सत्ताधारी’ असेच चित्र बुधवारी सभागृहात पाहायला मिळाले.नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची निकडीची विशेष सभा बुधवारी झाली. निकडीच्या सभेच्या मुद्द्यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. स्टेशनरी पुरवठ्याची निविदा, वीज मंडळाच्या डीपींचे स्थलांतर, पथदिवे व महालक्ष्मी यात्रेचे नियोजन या मुद्यांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीकेची झोंड उठविली.वाहतुकीला अडथळा ठरणारी लक्ष्मी चौकातील डीपी त्वरित न हलविल्यास अधिकाऱ्यांना सभागृहात बसू देणार नाही, असा इशारा किरण कदम यांनी दिला. कांही नगरसेविकांचे कुटुंबीय पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप नरेंद्र भद्रापूर यांनी केला.सांडपाणी बंधाऱ्यामधील सांडपाणी शेतीसाठी वापरण्याचा ठेका नगरसेविका बरगे यांचा भाऊ लक्ष्मण बाबूराव शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे बरगेंच्यावर पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी प्रा. कोरी यांनी केली. मक्ता पद्धतीची अनेक कामे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून नगरसेवकांचे हितसंबंधी व्यक्ती करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा ठेका घेऊन संबंधित मक्तेदाराने शहरवासीयांचे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी पालिकेला सहकार्यच केले आहे, असा खुलासा कदम यांनी केला. मात्र, विरोधक आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले.स्टेशनरी पुरवठ्याची सर्वांत कमी दरातील निविदादेखील बाजारभावापेक्षा जादा दराची असल्याने पालिकेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे संबंधित पुरवठादाराला बोलावून घेऊन चर्चेने दर कमी करून घ्यावेत आणि त्यानंतरच हा विषय मंजुरीसाठी सभागृहासमोर आणावा, अशी मागणी प्रा. कोरी यांच्यासह बसवराज खणगावे, राजेश बोरगावे, नितीन देसाई, आदींनी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली.चर्चेत रामदास कुराडे व दादू पाटील यांनीही भाग घेतला. प्रशासनाची जबाबदारी मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सांभाळली. यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्यासह सर्व नगरसेवक व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)महालक्ष्मी यात्रेला किती निधी मिळाला ?महालक्ष्मी यात्रेसाठी किती निधी मिळाला आणि कितीची कामे सुरू आहेत, असा प्रश्न प्रा. कोरी यांनी विचारला. यात्रेसाठी ४० लाखांच्या निधीची मागणी केली असून, अद्याप तो मिळालेला नाही. मात्र, नगरोत्थानच्या मंजूर निधीतून दोन कोटी ३५ लाखांची कामे सुरू आहेत, असा खुलासा नगराध्यक्षांनी केला. यात्रा नियोजनाच्या बैठकीसाठी विरोधी नगरसेवकांनाही बोलवावे व यात्रा काळात बड्याचीवाडी हद्दीतील उपनगरातील कचरा उचलण्याची व्यवस्था व्हावी, अशी सूचना प्रा. कोरी यांनी केली.
दीपा बरगे यांचे नगरसेवकपद रद्द करा
By admin | Updated: April 8, 2015 23:55 IST