कणकवली : रिक्त पदे भरण्यासाठी आम्ही मागणीच करू शकतो. त्यापलिकडे काय करणार? असा हतबल प्रश्न पंचायत समिती सभेत उपसभापती भिवा वर्देकर यांनी केला. पंचायत समिती सदस्य दादा कर्ले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध विभागातील रिक्त पदांविषयी प्रश्न उपस्थित केला असता वर्देकर यांनी उपरोक्त विधान केले. कणकवली पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी उपसभापती भिवा वर्देकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन नसल्याने लोकांना खासगी सुविधेकडे वळावे लागते. तालुक्यातील फोंडा, कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्यशासनाकडून आरोग्य केंद्रात सहा महिन्यांसाठी ही पदे भरण्यात आली. तर खारेपाटण आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेकडून एक पद भरण्यात आले. ही पदे कायमस्वरूपी भरली जावीत, अशी सूचना कर्ले यांनी केली. खारेपाटण पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. सर्व खात्यांत पदे रिक्त असून शासनाला जागे करण्यासाठी सर्वांनी आवाज उठवा, असे कर्ले सांगत असताना अध्यक्ष वर्देकर यांनी आपण मागणीच करू शकतो त्याशिवाय काय करणार? अशी हतबलता प्रगट केली. फोंडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची खारेपाटण येथे बदली झाली. दहा-पंधरा ओपीडी असलेल्या ठिकाणी दोन--तीन डॉक्टर असून फोंडा येथे ७०-८० ओपीडी असताना तेथील डॉक्टरची बदली करण्यात आली. आमचे डॉक्टर पुन्हा आम्हाला पाहिजेत, अशी मागणी सदानंद हळदिवे यांनी लावून धरली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत डॉक्टर देतो, असे आश्वासन दिले.हळदिवे यांनी सभागृहात आक्रमक होत सहा महिने विविध प्रश्न मांडून कोणतीही पूर्तता होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. पूर्तता होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत सभागृहात उभा राहणार असल्याचे सांगितले. फोंडा येथील बदली झालेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रायकर यांना सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली. डॉ. रायकर यांची बदली रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. फोंडा बाजारपेठेतील रस्त्याचे हॉटमिक्स करण्यात आले मात्र, लगेचच खड्डे पडले आहेत. साईडपट्टीचे कामही करण्यात आलेले नसल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुंभार यांना खडसावले. जॉब मंजूर झाला नसल्याने काम थांबल्याचे सांगताच जॉब मंजूर नसताना झालेली किती कामे दाखवू? असे हळदिवे यांनी विचारले. ११० गोठे आणि ३० सार्वजनिक विहिरींची जुनी कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मिळत नसेल तर सभागृह सोडून जातो, असा इशारा सदस्य सुरेश सावंत यांनी दिला. बांधकामच्या अभियंत्यांनी १८ जुलैपासूनन राज्यव्यापी संप असल्याने काम करू शकत नसल्याचे सांगितले. जुन्या कामांची मस्टर पूर्ण करावी, अशी सूचना सदस्यांनी केली. त्यानंतर पुढील बैठकीपूर्वी जुनी कामे पूर्ण करून देऊ असे आश्वासन कंत्राटी अभियंत्यामार्फत देण्यात आले. (प्रतिनिधी)
मागणीच करू शकतो, बाकी काय?
By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST