शिवाजी गोरे- दापोली -विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा कालावधी जवळ येऊ लागला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत व अर्ज दाखल झाल्यापासून निवडणुकीचा हा कालावधी अतिअल्प असल्याने यावेळी सर्वच उमेदवारांना गावागावातील मतदारापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी आता प्रचाराच्या सेकंड इनिंगमध्ये जाहीर सभा, गाव बैठका, विभागीय बैठका, धावते दौरे सुरु केले आहेत.संपूर्ण दापोली तालुक्यात विधानसभेकरिता १० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये मुख्य लढत आहे ती म्हणजे शिवसेनेचे सूर्यकांत दळवी, राष्ट्रवादीचे संजय कदम, काँग्रेसचे सुजित झिमण, भाजपाचे केदार साठे या चार मुख्य पक्षातील उमेदवारांत! केंद्रातील सत्तेचे भांडवल करत भाजपाने स्थानिक मुद्द्यांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भाजपाला स्पष्ट बहुमत द्या, हा मुद्दा प्रचारात घेऊन गावागावात हायटेक प्रचार सुरू केला आहे. हा प्रचार नरेंद्र मोदींना केंद्रस्थानी ठेवून करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींची लाट देशात आहे. तीच लाट विधानसभेतही दिसेल म्हणत अबकी बार केदारजी आमदार असे फलक गावागावात पोहोचल्याने भाजपाच्या उमेदवाराचीही जोरदार चर्चा सुरु आहे.शिवसेना - भाजपा युती तुटल्याने पहिल्यांदाच शिवसेना स्वबळावर गावागावात प्रचार करु लागली आहे. शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी यांनी सलग ५ वेळा दापोली विधानसभेचे नेतृत्व केले आहे. यावेळी षटकार मारण्याची संधी द्या, राज्यात शिवसेनेचे सरकार येणार आहे, आता आमदार दळवी नामदार होणार, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होणार, त्यांच्या मंत्रिमंडळात दळवींना महत्त्वाचे खाते मिळेल व २५ वर्षांचा राहिलेला विकास भरुन निघेल, अशी प्रलोभने शिवसेनेकडून दाखवण्यात येऊ लागली आहेत. परंतु २५ वर्षे संधी देऊन विकास झाला नाही, आता ५ वर्षात काय विकास करणार, असा सवाल तरुण मतदार करु लागल्याने मतदारातील नाराजी लपून राहिली नाही.दापोली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय कदम यांना उमेदवारी देण्यात आल्याने तरुण, उत्साही कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मतदारसंघात शिवसेनेला शह देण्याएवढी ताकद राष्ट्रवादीकडे असल्याने दापोली - खेड - मंडणगड या तीनही तालुक्यात प्रचारात पाठलाग करण्याची रणनीती वापरली जाऊ लागली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पक्षच राज्याचा विकास करु शकतो, असा प्रचार राष्ट्रवादीकडून करण्यात येऊ लागला आहे. ५ वेळा दळवींना संधी दिलीत, एकदाच संधी द्या, विकास करुन दाखवितो, असा जोरदार प्रचारही राष्ट्रवादीकडून सुरु झाला आहे. संजय कदम यांचा गावागावातील हायटेक प्रचार सुरु आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुजित झिमण यांचा प्रचार काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सुरु आहे. काँग्रेस पक्षाने केलेली विकासकामे, सोनिया गांधी, राहुल गांधी, गांधी घराणे, केंद्र सरकारच्या योजना व राज्य सरकारच्या योजनांवर आधारित झिमणचा प्रचार सुरु आहे. काँग्रेसकडून कुणबी कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिकृतपणे नाही, पण मागच्या दाराने याचा वापर केला जात आहे.
प्रचाराची ‘सेकंड इनिंग’ मतदारांना लुभावणारी
By admin | Updated: October 5, 2014 23:03 IST