चिपळूण : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, शासकीय, निमशासकीय कार्यालयातूनही निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती केली जात आहे. दि. १५ रोजी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, अशी धून शहरातील मुख्य एस. टी. बसस्थानकातील ध्वनीक्षेपकावरूनही ऐकावयाला मिळत आहे. नागरिकांच्या प्रवासाच्या दृष्टीने निगडीत असे बसस्थानकही आहे. ग्रामीण भागातील लोक कामधंद्यानिमित्त शहरात येतात. तरुण - तरुणी महाविद्यालयात जाण्यासाठी येतात तसेच बाजारहाट करण्यासाठी येणारी मंडळी यांचा एस. टी.शी दैनंदिन संबंध येतो. निवडणूक निर्णय आयोगाने प्रचार सभांवर आवश्यक ती बंधने लादली आहेत. संबंधित यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रम व प्रचारसभा घेतल्यास ते बेकायदा ठरणार आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांचा जास्तीत जास्त वैयक्तिक भेटीवर अधिक भर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शासकीय यंत्रणा निवडणूक कार्यक्रमासाठी सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे फलक शहरातील विविध मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आले आहेत. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील मतदारांना मतदार स्लिपांचे वाटप सुरु आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभाग घ्यावा, या उद्देशाने शहरातील मुख्य बसस्थानकातही मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान करावे, असे ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन केले जात आहे.एस. टी. स्थानकात सामान्य जनताही येत असल्याने मतदानाच्या टक्केवारीसाठी शासनाने ही नामी शक्कल लढवली आहे.ही निवडणुकीची धून वारंवार प्रवाशांच्या कानावर पडत आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत एस. टी. प्रशासनाने लक्ष दिले असल्याचे वाजणाऱ्या धूनवरुन दिसून येत आहे. (वार्ताहर)
बसस्थानकातही वाजू लागली धून
By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST