रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या अंदाजपत्रकासाठी पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांची तयारी सुरू झाली आहे. २०१५-१६ या वषाचे हे शंभर कोटींचे अंदाजपत्रक रस्त्यांच्या कामांवर भर देणारे असेल. फेब्रुवारी महिनाअखेरीस पालिकेच्या सभागृहात हे अंदाजपत्रक मांडले जाणार आहे. अंदाजपत्रकाची ही आजवरची ‘रेकॉर्डब्रेक’ रक्कम ठरणार आहे. गतवर्षी पालिकेचे अंदाजपत्रक ५५ कोटींचे होते. यावेळी दुप्पट रकमेचे अंदाजपत्रक मांडले जाणार असल्याने पालिका क्षेत्रातील विकासकामांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी पालिकेने ५५ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर केले होते. त्यापैकी ५३ कोटी खर्च झाला असून, २ कोटी रक्कम शिल्लक आहे. यावर्षी पालिकेच्या तिजोरीत शासनाच्या विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी जमा होणार आहे. नगरोत्थानअंतर्गत पालिकेला २८ कोटी निधी मंजूर असून, त्यातील १४ कोटी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. १४ कोटी यावर्षी मिळणार आहेत. नगरोत्थानचा २८ कोटींचा निधी पूर्णत: रस्त्यांच्या डांबरीकरणावर खर्च केला जाणार आहे. अंदाजपत्रकात विविध मार्गाने पालिकेला मिळणारे ५५ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे. हे उत्पन्न घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे यांसारख्या स्रोतांंपासून मिळणार आहे. या ५५ कोटी रुपयांतील ४५ टक्के रक्कम पालिका कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होणार आहे. याशिवाय तेरावा वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान, सुजल निर्मल योजना, नाविन्यपूर्ण योजनांतून पालिकेला १७ कोटींचा निधी यावर्षी अपेक्षित आहे. त्यामुळेच २०१५-१६ या वर्षासाठीचे पालिकेचे अंदाजपत्रक हे शंभर कोटींवर जाणार असल्याचे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले. आता एवढे मोठे अंदाजपत्रक कोणता खर्च दाखवण्यात आला आहे, याचे कोडे लवकरच सुटणार आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक ८ जानेवारी २०१५ रोजी होणार असून, या बैठकीत २०१५-१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकातील महत्त्वाचे विषय, विकासकामे ठरवली जाणार आहेत. मात्र, पालिकेत शिवसेनेकडे सर्व समिती सभापतीपदे असल्याने बैठकीत काय होणार याकडे लक्ष आहे.विकास आराखड्यानुसार तरतूदरत्नागिरी पालिकेचा शहर विकास आराखडा दोन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला होता. त्यानुसार ७० कोटीपेक्षा अधिक रकमेच्या विकास आराखड्याला शासनमान्यता मिळाली. यासाठी पालिका या अर्थसंकल्पात काही कोटी रकमेची तरतूद करणार आहे. याबाबत स्थायी समितीत लवकरच चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
अंदाजपत्रक यंदा शंभर कोटींचे!
By admin | Updated: January 5, 2015 23:22 IST