कणकवली : जिल्ह्यातील घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या घरफोड्या उघडकीस आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा. त्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत देऊ शकतो, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील आढावा बैठकीत सांगितले.जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेसह प्रशासकीय आढावा घेतला. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, उपतालुकाप्रमुख राजू राणे, युवा सेना जिल्हाध्यक्ष अॅड. हर्षद गावडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, विभागीय नियंत्रक चेतन हसबनीस, तहसीलदार समीर घारे आदी उपस्थित होते. कणकवली, सावंतवाडीत झालेल्या चोऱ्यांसंदर्भात पालकमंत्री केसरकर यांनी आढावा घेतला. कणकवलीतील मागील चोऱ्यांमधील मुद्देमाल हस्तगत झाला आहे. घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. गस्त वाढवली असून नाकाबंदी करण्यात येत आहे. शिवाजीनगरमधील घरफोडीत ठसे मिळाले असून त्याआधारे शोध घेतला जाईल, असे डीवायएसपी खरात यांनी सांगितले. मनुष्यबळ आणि साधनांची कमतरता भासत असल्याचे खरात यांनी सांगितले. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी जोरदार प्रयत्न करा. आयजींशी यासंदर्भात आपण बोलतो.येथील एस. एम. हायस्कूलचे शिपाई रमेश मणचेकर खूनप्रकरणात अद्याप धागेदोरे मिळालेले नाहीत. हे पोेलिसांना शोभादायक नाही. आरोपींसंदर्भात माहिती मिळण्यासाठी लोकांमध्ये नावे उघड होणार नाहीत, असा विश्वास निर्माण करा, असे केसरकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. खारेपाटण बसस्थानकाचे काम सुरू आहे. तर दोडामार्ग बसस्थानकाचा ठेकेदार काम सोडून पळून गेला. वैभववाडी स्थानकासाठीची जागा शासनाकडे आहे. त्यासाठी ५० ते ६० लाखांचे अंदाजपत्रक असून निधीची कमतरता असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. तळेरे वाघाची वाडी आणि म्हाळुंगेवाडी बसफेऱ्या मंगळवारपासून सुरू करण्यासह बांदा-नाबरवाडी अशी बसफेरी सोडावी, असे केसरकर यांनी हसबनीस यांना सांगितले. प्रत्येक आगारात गाड्यांची कमतरता असून विशेष धोरण राबवून गाड्या आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे केसरकर यांनी सांगिंतले. पंढरपूर येथे वारीदरम्यान एसटीचा नेमलेला स्टाफ दारू पिऊन धिंगाणा घालतो त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गटविकास अधिकाऱ्यांबाबत नाराजीया बैठकीला सार्वजनिक बांधकाम आणि कणकवलीचे गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते. बीडीओंच्या खात्याचा मी मंत्री आहे. किमान त्यांनी आढावा बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त करत पालकमंत्र्यांनी वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घालण्याचे आदेश दिले.५० टक्के बुकींगमध्ये गाड्यामाघी वारीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे वारकरी जातात. त्यांच्यासाठी मागील वर्षांचे रेकार्ड बघून जिल्हास्तरावर शक्य असल्यास ५० टक्के बुकींग झाल्यानंतर गाडी आरक्षित करा, असे केसरकर यांनी विभाग नियंत्रक हसबनीस यांना सांगितले. विभागातील एसटी बस फेऱ्यांचा प्रश्न सुटण्यासाठी नव्या गाड्या आवश्यक आहेत. यासाठी एसटीच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा करू. तसेच वैभववाडीतील बसस्थानकाच्या शासकीय जागेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो, असे केसरकर यांनी सांगितले.
घरफोड्या उघडकीस आणा
By admin | Updated: December 29, 2014 23:36 IST