पुरळ : देवगड तालुक्यातील भाजपने देवगड तालुका खरेदी-विक्री संघावर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून खरेदी-विक्री संघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. एकूण १५ संचालक असलेल्या या संस्थेवरती भाजपचे १० उमेदवार निवडून आले आहेत.अनेक वर्षे भाजपप्रणित पॅनलची सत्ता खरेदी-विक्री संघावर आहे. याला आव्हान देत काँग्रेसचे उमेदवार उल्हास मणचेकर व शिवसेना उमेदवार दिगंबर तावडे आणि अपक्ष महिला उमेदवार पूजा नंदकिशोर कांदळगांवकर यांच्यामुळे देवगड तालुका खरेदी विक्री संघाची रविवारी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये या तिन्ही उमेदवारांना आपले डिपॉझिट राखता आले नाही.या निवडणुकीमध्ये भाजपा व राष्ट्रवादी पक्षाने सहकार समृद्धी पॅनल करून निवडणूक लढविली. यामध्ये या पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले. भाजपच्या विजेत्या महिला उमेदवार स्नेहलता देशपांडे यांना ५०१ मते, पूजा खोत यांना ४६७ मते मिळाली. पराभूत अपक्ष उमेदवार पूजा कांदळगांवकर यांना केवळ ७४ मते मिळाली.सहकार समृध्दी पॅनलचे राष्ट्रवादीचे उमेदवार रामदास अनभवणे यांना ४९३ मते व चंद्रकांत पाळेकर यांना ४८७ मते मिळाली. भाजपचे उमेदवार प्रसाद मोंडकर यांना ४८४ मते, प्रकाश बोडस यांना ४९३ मते, संतोष फाटक ४८९ मते, रविंद्र तिर्लोटकर यांना ४६८ मते मिळून ते विजयी झाले आहेत. पराभूत उमेदवार उल्हास मणचेकर यांना ४९ मते व दिगंबर तावडे यांना केवळ २७ मते मिळाली. खरेदी-विक्री संघामध्ये १५ संचालकांची कार्यकारणी असून यापूर्वी ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे जयदेव कदम, संतोष किंजवडेकर, शैलेश जाधव, धोंडू कोकरे यांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये संभाजी साटम, अजित राणे व ग्रेसेस फर्नांडीस हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (वार्ताहर)
खरेदी-विक्री संघावर भाजपचे वर्चस्व
By admin | Updated: June 1, 2015 00:17 IST